बंगळुरूमध्ये एका उबर ड्रायव्हरने मुंबईच्या एका प्रवाशाला एसी चालू करायला सांगितल्यामुळे रस्त्यातच सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रायव्हरने कानडीत बोलण्याची सक्ती करत रागाने राईड अर्धवटच संपवली. प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर उबरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बंगळुरूमध्ये एका बंगळुरू उबर प्रवासादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. मुंबईच्या एका प्रवाशाने ड्रायव्हरला एसी चालू करायला सांगितला, त्यावर ड्रायव्हरने चिडून प्रवाशाला सामानासह रस्त्यातच सोडून दिलं.
@Jokingkash या युजरने आपला हा अनुभव X वर शेअर केला आहे. त्याने एक व्हिडिओ पोस्ट करून पूर्ण घटना सांगितली आणि कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच, अशा परिस्थितीत एकट्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.
त्याने आपल्या पोस्टमध्ये कंपनीच्या अधिकृत हँडलला टॅग करत लिहिलं, “अरे @UberIN_Support @Uber_India हे तुमचे सेफ्टी स्टँडर्ड्स आहेत का? एका हिंसक आणि शिवीगाळ करणाऱ्या ड्रायव्हरने मला रस्त्यात सोडलं. मला कानडीत बोलायला सांगितलं. तेही फक्त एसी राईडमध्ये एसी चालू करायला सांगितल्यामुळे? आणि तुम्ही मला दुसरी राईड दिली नाही किंवा माझ्या सुरक्षिततेची खात्रीही दिली नाही."
नेमकं काय झालं?
व्हिडिओमध्ये या व्यक्तीने सांगितलं की, विमानतळावरून एचएसआर लेआउटपर्यंत जाण्यासाठी त्याने १,१०० रुपये दिले होते. रस्त्यावरील सुरू असलेल्या कामामुळे धूळ आणि धुराचा त्रास होत असल्याने त्याने ड्रायव्हरला एसी चालू करायला सांगितला, तेव्हा हा वाद सुरू झाला.
तो म्हणाला की, ड्रायव्हरने त्याच्या विनंतीला उत्तर देण्याऐवजी कानडीत बोलायला सुरुवात केली. राईड अचानक थांबवली आणि गाडी एका निर्मनुष्य ठिकाणी उभी केली. प्रवाशाने पुढे सांगितलं की, त्याने क्रेडिट कार्डने पूर्ण पैसे दिले होते, तरीही त्याला सामानासह रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आलं.
ही घटना सांगताना तो म्हणाला, “या देशाचं काही खरं नाही. मी विमानतळावरून एचएसआरसाठी ११०० रुपयांची कॅब बुक केली होती. मला सांगताही येत नाहीये, पण या माणसाने पूर्णपणे कानडीत बोलायला सुरुवात केली कारण मी त्याला एसी चालू करायला सांगितला, ज्याचे मी पैसे दिले होते. ही एसी राईड होती आणि या माणसाने राईड संपवली, कुठेतरी मध्यरात्री गाडी उभी केली. मला माहित नाही मी कुठे आहे, मी क्रेडिट कार्डने पूर्ण पैसे दिले आहेत आणि उबरने अजूनही दुसरी राईड दिलेली नाही."
पाहा व्हायरल पोस्ट
या व्यक्तीने पुढे सांगितलं की, जेव्हा त्याने हा व्हिडिओ काढला, तेव्हा तो जवळपास ५० मिनिटे अडकून पडला होता. त्याला कानडी बोलता येत नसल्यामुळे आणखी दोन ड्रायव्हर्स आले आणि त्यांनी त्याला धमकावलं. त्याच्या दाव्यानुसार, त्यापैकी एकाने आधी हिंदी येत नसल्याचं सांगितलं आणि नंतर हिंदीत बोलला.
व्हायरल पोस्टवर उबरची प्रतिक्रिया
या पोस्टनंतर उबरने त्यांच्या अधिकृत X अकाउंटवरून तक्रारीला उत्तर दिलं. कंपनीने लिहिलं, “आम्ही डायरेक्ट मेसेजद्वारे रिप्लाय दिला आहे. कृपया तो तपासावा ही विनंती."
दरम्यान, ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आणि इतर युजर्सनी या आरोपांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
















