एचएमटी घड्याळांना पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत. सध्या महिन्याला १ लाखांहून अधिक घड्याळांची मागणी आहे. २०२७ पर्यंत दरमहा २५ हजार घड्याळे तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कन्नडिगा, रोमन, सोना आणि स्टेलर कलेक्शनला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
हिंदुस्थान मशीन टूल्स (HMT) घड्याळे पुन्हा एकदा लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. जुन्या क्लासिक डिझाईन्स आणि नवीन कलेक्शनमुळे या आयकॉनिक भारतीय ब्रँडची मागणी वाढतेय. कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की, बाजारात एचएमटी घड्याळांची महिन्याला १ लाखांपेक्षा जास्त मागणी आहे. पण, सध्या खेळत्या भांडवलाच्या कमतरतेमुळे कंपनी महिन्याला फक्त १०,००० घड्याळेच असेंबल करू शकते. मागणी आणि पुरवठा यातील ही दरी भरून काढण्यासाठी एचएमटी आता आपले उत्पादन दरमहा १३,००० पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. उत्पादन आणखी वाढवण्यासाठी नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्याची शक्यताही कंपनी तपासून पाहत आहे.
घड्याळ उत्पादन वाढवण्यासाठी एचएमटीचा नवा कारखाना
या आयकॉनिक ब्रँडला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एचएमटी एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पामुळे कंपनीला दरमहा २५ हजार घड्याळे बनवणे शक्य होईल.
२०२७ च्या मध्यापर्यंत बाजारातील किमान निम्मी मागणी पूर्ण करण्याचे एचएमटीचे ध्येय आहे. या विस्तारामुळे कंपनीची उत्पादन क्षमता मजबूत होईल आणि देशभरातील वाढती मागणी पूर्ण करण्यात मदत होईल.
दरम्यान, ग्राहकांचा अभिप्राय आणि बाजाराच्या अपेक्षांनुसार एचएमटीची इन-हाउस डिझाईन टीम ३ नवीन डिझाईन्सवर काम करत आहे. ही डिझाईन्स सध्या डेव्हलपमेंटच्या टप्प्यात असून ती अद्याप अंतिम झालेली नाहीत.
एचएमटी कन्नडिगा घड्याळांची दमदार विक्री
नुकत्याच लाँच झालेल्या एचएमटी कन्नडिगा घड्याळांना ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असून, विक्रीने कंपनीच्या अपेक्षाही ओलांडल्या आहेत.
२ आणि ३ नोव्हेंबर या केवळ दोन दिवसांत ३ हजारांहून अधिक कन्नडिगा घड्याळांची विक्री झाली. सध्या कंपनी आणखी काही हजार युनिट्स बनवत असून ती लवकरच बाजारात येतील.
पण, एचएमटी कन्नडिगा हे एक लिमिटेड-एडिशन कलेक्शन आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एका ठराविक मर्यादेनंतर याचं उत्पादन थांबवावं लागू शकतं.
कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी एचएमटी कन्नडिगाचे अनावरण
केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी १ नोव्हेंबरला कर्नाटक राज्योत्सवाचे औचित्य साधून एचएमटी कन्नडिगा घड्याळांचे अनावरण केले.
एचएमटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन. रमेश कुमार यांनी सांगितले की, या घड्याळांमध्ये सनबर्स्ट डायल आणि अस्सल इटालियन लेदर स्टॅप्स आहेत, ज्यामुळे हे कलेक्शन अतिशय खास दिसते.
नवीन कन्नडिगा कलेक्शनसोबतच, सोना आणि स्टेलर सीरिजसारख्या एचएमटीच्या जुन्या ब्रँड्सचीही चांगली विक्री होत आहे. ग्राहकांना एचएमटीच्या पारंपरिक डिझाईन्सचे आजही आकर्षण असल्याचे यातून दिसून येते.
एचएमटी रोमन घड्याळांचीही क्रेझ कायम
घड्याळांची आवड असणाऱ्यांमध्ये एचएमटी रोमननेही खूप उत्सुकता निर्माण केली आहे, ज्यामुळे कंपनीच्या या क्लासिक मॉडेलची मागणी वाढली आहे.
मात्र, एचएमटी रोमन लगेच पुन्हा स्टॉकमध्ये येण्याची शक्यता कमी आहे. या घड्याळात वापरण्यात आलेली खास डिझाईनची केस दुसऱ्या उत्पादकाकडून घेतली जाते, त्यामुळे स्टॉक लवकर भरणे कंपनीला कठीण जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केस पुन्हा तयार करावी लागेल, त्यामुळे हे घड्याळ पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध व्हायला थोडा वेळ लागू शकतो.
एचएमटीच्या सर्वेक्षणातून दिसली बाजारातील ताकद
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या एचएमटीने बाजारातील मागणी आणि ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी एक अधिकृत सर्वेक्षण केले.
या सर्वेक्षणातून दरमहा १ लाखांपेक्षा जास्त एचएमटी घड्याळांची मागणी असल्याचे समोर आले. यातून ब्रँडची बाजारातील क्षमता दिसून येते.
आता कंपनी केवळ पारंपरिक डिझाईन्सपुरती मर्यादित न राहता आजच्या ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ग्राहकांच्या सूचनांचा विचार करून नवीन कलेक्शन तयार केले जात आहे.
एचएमटीचा मूळ वारसा जपत, जास्तीत जास्त लोकांना आवडतील अशी घड्याळे तयार करण्यावर इन-हाउस डिझाईन टीम भर देत आहे.
उत्पादन वाढवणे, नवीन डिझाईन्स आणणे आणि नवा कारखाना उभारण्याच्या योजनांद्वारे, एचएमटी भारताच्या घड्याळ बाजारात आपले स्थान मजबूत करू पाहत आहे. क्लासिक आणि नवीन घड्याळांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीला मोठी उभारी मिळाली आहे.
















