यमुना नदीत कचरा टाकणाऱ्या एका व्यक्तीला दोन महिलांनी जाब विचारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर नदी प्रदूषण आणि नागरिकांच्या जबाबदारीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. यमुना नदीत कचरा टाकणाऱ्या एका व्यक्तीला दोन महिलांनी रोखलं आणि त्याला जाब विचारला.

प्रिया कुमारी नावाच्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती व्यक्ती आधीच प्रदूषित असलेल्या नदीत प्लास्टिक, राख, मातीची मडकी आणि पूजेचं साहित्य टाकताना दिसतेय.

View post on Instagram
 

या व्हिडीओमध्ये एक महिला वैतागून म्हणते, 'भैय्या, आधीच इतकी घाण आहे, तुम्ही परत कचरा टाकताय.' तिचं हे वाक्य सध्या इंटरनेटवर खूप गाजतंय.

नदी आधीच प्रदूषणाचा सामना करत आहे, त्यात आणखी कचरा टाकल्याने परिस्थिती अधिकच बिघडेल, असं या महिलांनी त्या व्यक्तीला समजावून सांगितलं.

व्यक्तीचा आरोप: व्हिडीओ फक्त कंटेंटसाठी बनवला जातोय

वाद जसजसा वाढला, तसतसा त्या महिलांनी नदीत फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्यावर बोट ठेवलं. लोक अजूनही नदीला कचराकुंडी का समजतात, असा सवाल त्यांनी केला.

दिवाळीसारख्या सणांनंतर मातीची मडकी, दिवे आणि पूजेचं साहित्य असं सगळं नदीतच फेकून दिलं जातं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

यावेळी त्या व्यक्तीने चिडून महिलांवरच आरोप केला. 'तुम्ही फक्त सोशल मीडिया कंटेंटसाठी हा व्हिडीओ रेकॉर्ड करताय,' असं तो म्हणाला.

पण, त्यापैकी एका महिलेने आपलं रेकॉर्डिंग करण्यामागचं कारण स्पष्ट केलं. अशा घटना उजेडात आणण्यासाठी आणि लोकांना पुन्हा अशी चूक करण्यापासून रोखण्यासाठी हा प्रकार रेकॉर्ड करणं गरजेचं असल्याचं ती म्हणाली.

जर कोणी असे प्रकार रेकॉर्ड केले नाहीत किंवा प्रश्न विचारला नाही, तर लोक बिनदिक्कतपणे नदीत कचरा टाकतच राहतील, असंही तिने सुनावले.

व्हायरल व्हिडीओला मिळाले लाखो व्ह्यूज, नेटकऱ्यांकडून कौतुक

हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून त्याला १५.७ दशलक्ष (सुमारे दीड कोटींहून अधिक) व्ह्यूज मिळाले आहेत. पर्यावरणाच्या प्रश्नावर बेजबाबदारपणे वागणाऱ्या व्यक्तीला रोखल्याबद्दल अनेक युजर्सनी या महिलांचं कौतुक केलंय.

अनेकांनी त्यांच्या कृतीचं समर्थन करत म्हटलंय की, नदीची अवस्था आणखी वाईट होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी योग्य वेळी आवाज उठवला.

तर दुसरीकडे, काही युजर्सनी सार्वजनिक पाणवठ्यांच्या ठिकाणी सरकारची कडक कारवाई आणि कचरा व्यवस्थापनाची गरज असल्याचं मत मांडलं आहे.

या घटनेमुळे यमुनेच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आणि योग्य कचरा व्यवस्थापन जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढीच नागरिकांची जबाबदारीही महत्त्वाची आहे.