आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'थम्मा' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने ४ दिवसांत ५९.७६ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट एका पत्रकाराच्या पिशाच्च बनण्याची कथा सांगतो. यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'थम्मा' दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ३ दिवसांतच कोट्यवधींची कमाई करत ५० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. चला तर मग जाणून घेऊया की या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी किती कमाई केली आहे.
'थम्मा'ने चार दिवसांत किती कमाई केली
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'थम्मा'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २५.११ कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी १९.२३ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाऊबीजेच्या मुहूर्तावर १२.५० कोटींची कमाई केली आहे. तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने २.९२ कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवसाच्या आकड्यांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. या चित्रपटाने भारतात एकूण ४ दिवसांत ५९.७६ कोटींची कमाई केली आहे. २४ ऑक्टोबर म्हणजेच 'थम्मा'च्या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी चित्रपटाची एकूण हिंदी ऑक्युपन्सी ७.३५% होती. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
'थम्मा' चित्रपटात काय आहे खास?
हॉरर कॉमेडी चित्रपट 'थम्मा'मध्ये रश्मिका मंदान्ना आणि आयुष्मान खुराना यांच्यात रोमान्स पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची कथा पत्रकार आलोक गोयल (आयुष्मान खुराना) याच्यावर केंद्रित आहे. एका झपाटलेल्या जंगलात एका रहस्यमय ताडकाशी (रश्मिका मंदान्ना) भेट झाल्यानंतर तो पिशाच्च बनतो. त्यांची प्रेमकथा तेव्हा हिंसक वळण घेते जेव्हा पिशाच्च राजा यक्षसन (नवाजुद्दीन सिद्दीकी) धुमाकूळ घालतो. प्रेक्षकांनी 'थम्मा' पाहून चांगली प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'थम्मा' हा मॅडॉक हॉरर कॉमेडी फ्रँचायझीचा पाचवा भाग आहे. या चित्रपटात रश्मिका आणि आयुष्मानसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


