Parbhani News: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात, ओबीसी आरक्षण टिकणार नाही या भीतीपोटी कुमार नारायण आघाव या २२ वर्षीय तरुणाने जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती.
परभणी: परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसर शोकमग्न झाला आहे. कुमार नारायण आघाव (२२) या तरुणाने ओबीसी आरक्षण टिकणार नाही या भीतीपोटी शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. "ओबीसी आरक्षण संपल्याची चर्चा ऐकत होतो… त्यामुळे माझी मनस्थिती ढासळली..." असे भावनिक शब्द लिहून ठेवलेली चिठ्ठी त्याच्याकडून पोलिसांना सापडली आहे.
चार बहिणींचा एकुलता एक भाऊ
कुमार हा आघाव कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. चार बहिणींसह संपूर्ण कुटुंबाचा आधार असलेला कुमार गेल्याने घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी सरकारने तातडीने कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी
कुमारने चिठ्ठीत लिहिले की, ओबीसी आरक्षण सुरक्षित नसल्याची चर्चा समाजात सुरू होती. या विचारांनी त्याची मानसिक अवस्था बिघडली होती. "आमच्या तरुण बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणून मी माझे जीवन बलिदान देत आहे." या ओळींमुळे संपूर्ण समाजात खळबळ उडाली आहे.
शेतात लिंबाच्या झाडाला गळफास
२३ सप्टेंबर रोजी तो परभणीहून गावाकडे आला होता. घरी आईला "शेताकडे जातो" असे सांगून बाहेर पडलेल्या कुमारचा मृतदेह रात्री उशिरा शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. माहिती मिळताच बोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला.
समाजात हळहळ
या घटनेने फक्त आघाव कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गाव आणि समाज थरारले आहेत. तरुण वयात ओबीसी आरक्षणाबद्दलच्या असुरक्षिततेने एका जीवाला संपवायला लावले, ही बाब चिंताजनक मानली जात आहे.


