Sakhe Gan Sajani Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा हटके चित्रपट 'सखे गं साजणी' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. समुद्रकिनाऱ्यावरील हृदयाकृती चिन्ह असलेल्या पोस्टरने उत्सुकता वाढवली आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नव्या दमाचा एक हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते-दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब प्रॉडक्शन’ हाऊसचा नवा चित्रपट ‘सखे गं साजणी’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
प्रथमदर्शनी प्रेमात पाडणारा पोस्टर लूक
चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण दिलं आहे. समुद्र किनाऱ्यावर दोन मुली आणि एक मुलगा पाठमोरे उभे असून, त्यांनी हातांनी ‘हार्ट’चं चिन्ह तयार केलं आहे. या दृश्यातून मैत्री, प्रेम आणि नात्यांची एक सुंदर गोष्ट उलगडणार, याची झलक मिळते. मात्र या तिघांचे चेहरे दिसत नसल्याने, चित्रपटात नेमके कलाकार कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
पोस्टरमागची रणनीती, उत्सुकतेची बांधणी
प्रार्थना बेहेरेने याआधी चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना या नव्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. आता पोस्टर आणि टिझरच्या माध्यमातून चित्रपटाचं नाव, दृश्यभाषा आणि मूड समोर आला असला, तरी कथा, भूमिका आणि स्टारकास्टबाबत निर्मात्यांनी अजूनही सस्पेन्स कायम ठेवला आहे.
'सखे गं साजणी' नावातच आहे कथानकाची नजाकत
चित्रपटाच्या नावातूनच एका हळव्या, भावनिक आणि नात्यांच्या गुंफणीत अडकलेल्या कथानकाची झलक मिळते. याचे दिग्दर्शन अभिषेक जावकर करत असून, प्रार्थना बेहेरे या प्रकल्पात निर्माता म्हणूनही सक्रिय आहे. ‘रेडबल्ब प्रॉडक्शन’ हाऊसचा हा दुसरा मोठा सिनेमा असून, त्यावर सध्या मराठी चित्रपट रसिकांची नजर लागलेली आहे.
कधी उलगडेल चेहऱ्यांचा गूढ?
चित्रपटाच्या टीमने जाणूनबुजून पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे न दाखवता, प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण केली आहे. ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी यशस्वी ठरताना दिसतेय, कारण ‘सखे गं साजणी’बाबत सोशल मीडियावर कमेंट्स आणि अंदाज लावण्याचं प्रमाण वाढलं आहे.


