Punha Shivaji Raje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट दिवाळी २०२५ मध्ये प्रदर्शित होणारय. टीझरमध्ये सिद्धार्थ बोडके शिवरायांच्या भूमिकेत असून चित्रपट इतिहासाचे चित्रण नसून समाजाला दिशा देणाराय.  

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लोकनेते, आणि क्रांतीचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज आता नव्या रूपात रूपेरी पडद्यावर पुन्हा अवतरणार आहेत. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या भव्य आणि आशयघन चित्रपटाची दिवाळीत प्रदर्शित होण्याची घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आली आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाची पहिली झलक विठ्ठल-रखुमाईच्या आशीर्वादाने रसिकांसमोर सादर करण्यात आली आहे.

केवळ इतिहास नव्हे, आजच्या काळासाठी शिवराय

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सिद्धार्थ बोडके यांनी साकारली असून, टीझरमध्ये त्यांच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसर देखील झळकली आहे. ‘राजं… राजं…’ या हाकेमधून जे सामर्थ्य, भावनाशक्ती आणि स्फूर्ती व्यक्त होते, ती थेट काळजाला भिडते. "छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ तलवार घेऊन लढणारा योद्धा नाही, तर विचारांची मशाल घेऊन समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक आहे," असा संदेश टीझरमधून प्रकर्षाने उमटतो. या चित्रपटात केवळ भूतकाळाचं चित्रण नाही, तर आजच्या समाजाला दिशा देणारा, झोपेतून जागं करणारा विचार केंद्रस्थानी आहे.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा पहा टीझर

View post on Instagram

"शिवराय म्हणजे विचार", दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं स्पष्ट मत

महेश मांजरेकर म्हणतात, "‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा इतिहासात रमणारा चित्रपट नाही. तो आजच्या अंधारात शिवरायांच्या विचारांचा प्रकाश पेरणारा चित्रपट आहे. समाजात निराशा, दिशाहीनता, उदासीनता वाढताना दिसते. अशा वेळी आपल्याला पुन्हा शिवाजी महाराजांच्या मूल्यांकडे वळणं आवश्यक आहे." हा चित्रपट म्हणजे इतिहासाची उजळणी नाही, तर नव्या पिढीच्या मनात शिवरायांची प्रेरणा जागवण्याचा जागर आहे.

दिवाळीत ‘शिवरायांचे पुनरागमन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात अंतर्भूत असलेली शिस्त, आत्मभान, न्यायप्रियता आणि लोककल्याणाचा विचार आजही तेवढाच समर्पक आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट केवळ सिनेमागृहापुरता मर्यादित न राहता, एक सामाजिक चळवळ, एक नवचैतन्य ठरणार आहे.

प्रेक्षकांसाठी दिवाळी खास

दिवाळी 2025 मध्ये ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट महाराष्ट्रभर झळकणार असून, इतिहास आणि वर्तमान यांचा सेतू म्हणून तो प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना भावेल, असं संकेत टीझरने दिले आहेत.