Sonalee Kulkarni Dance Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'मन तुझं जलतरंग' या कवितेवर लंडनच्या रस्त्यावर नृत्य सादर केले आहे. इंग्लंडमधील युरोपियन मराठी संमेलनात सादर केलेल्या या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या खास अंदाजाने चाहत्यांची मनं जिंकताना दिसत आहे. ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘पोश्टर गर्ल’, ‘मितवा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी सोनाली सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय आहे.
सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेली सोनाली कुलकर्णीने नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जो प्रचंड चर्चेत आहे. 'मन तुझं जलतरंग…' या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कवितेवर तिने लंडनच्या रस्त्यावर पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये थिरकत हटके अंदाजात डान्स केला आहे. ही कविता वैभव जोशी आणि अमर ओक यांच्या ‘ऋतू बरवा’ या कार्यक्रमातून विशेष प्रसिद्ध झाली असून, अनेकांच्या काळजाला भिडली आहे.
कवितेच्या काही ओळींचा खास उल्लेख करायचा झाल्यास
“मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज,
दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज,
चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही,
भरतीचा माज नाही, ओटीची लाज नाही...”
या अर्थगर्भ ओळींवर सोनालीने केलेला नृत्याविष्कार केवळ डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. इंग्लंडमधील युरोपियन मराठी संमेलन या खास कार्यक्रमाच्या निमित्ताने ती तिथे उपस्थित होती आणि तिने ही सुंदर कलाकृती साकारली.
व्हिडीओ शेअर करताना सोनालीने लिहिलं, “व्हायरल कवितेवर Reel व्हिडीओ बनवला नाही तर पाप लागेल… आणि ती संधी इंग्लंडमध्ये युरोपियन मराठी संमेलनच्या निमित्ताने मिळाली. अशी संधी मिळत असेल तर का बरं सोडावी?”, या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “पैठणीच्या कोणत्याही ड्रेसमध्ये तू सुंदरच दिसतेस…”, “ट्रेंड सेटर सोनाली मॅम”, “अद्भुत डान्स आणि उत्तम अभिव्यक्ती” अशा विविध प्रतिक्रियांमधून नेटकऱ्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
दरम्यान, सोनाली लवकरच ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या पुस्तकावर आधारित असून, प्रेक्षकांना इतिहासातील एक प्रेरणादायी स्त्री व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणार आहे.


