मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिला सांगलीहून मुंबईकडे प्रवास करत असताना एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. बसमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या एका मुलाने तिच्या कमरेला हात लावण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहर असो वा खेडं, सामान्य स्त्री असो की अभिनेत्री प्रत्येकाला अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं. मराठी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगली ते मुंबई प्रवासात तिला आलेल्या एका धक्कादायक अनुभवाची आठवण सांगितली.

“तो हात माझ्या कमरेजवळ आला आणि...”

सई म्हणाली, "मी करिअरच्या सुरुवातीला सांगलीहून मुंबईपर्यंत रात्रीच्या बसने प्रवास करत असे. एकदा अशाच प्रवासात, मागच्या सीटवर बसलेल्या एका मुलाने हात पुढे करत माझ्या कमरेजवळ हात ठेवला.क्षणभर गोंधळले, पण लगेचच मी त्याचा हात पकडून इतक्या जोरात मुरगळला की तो मुलगा किंचाळला. त्याला ठामपणे सांगितलं, ‘पुन्हा असा हात आला, तर तुला वेगळा झालेला हात मिळेल.’मला अशा गोष्टींची भीती वाटत नाही."

सई ताम्हणकर – अभिनयाची वेगळी छाप

2008 साली सिनेमा क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सईने ‘दुनियादारी’, ‘पिंजरा’, ‘क्लासमेट्स’, ‘हंटर’, ‘टाईम प्लीज’ यांसारख्या चित्रपटांतून प्रभावी भूमिका साकारल्या. तिच्या अभिनयशैलीमध्ये एक सहजता आणि ताकद आहे, जी तिला इतरांपासून वेगळी ठरवते.

परंपरेच्या चौकटीबाहेरची अभिनेत्री

सई नुसती सौंदर्यवती नाही, तर प्रत्येक भूमिकेला स्वतःचं एक वेगळं रूप देणारी अभिनेत्री आहे. ‘समांतर’ या वेबसीरिजमधील तिचं काम प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं. बॉलिवूडमधील 'मीमी' या चित्रपटातही तिने लक्षवेधी कामगिरी केली.