अभिनेत्री राजश्री मोरे हिने एक व्हिडीओ शेअर करत मराठी लोक मेहनत करत नाही असे त्यामध्ये म्हटले होते. यानंतर युजर्सने संताप व्यक्त केल्यानंतर व्हिडीओ डिलीट केला.
मुंबई : राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी भाषेच्या वादाला राजकीय उधाण आले असताना, एक मराठी अभिनेत्री केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 'मराठी माणसाला मेहनत करायला शिकवा', असे विधान करून अभिनेत्री राजश्री मोरे (Rajshree More) हिने मराठी जनतेच्या भावना दुखावल्या. मात्र, यानंतर झालेल्या संतप्त प्रतिक्रिया, मनसैनिकांचा आक्रोश आणि पोलिसांत दाखल तक्रारीनंतर अखेर राजश्री मोरेने सार्वजनिक माफी मागून तो व्हिडीओ डिलिट केला.
काय घडलं नेमकं?
राजश्री मोरे ही मुंबईच्या वर्सोवामध्ये राहणारी अभिनेत्री आहे. राखी सावंतची मैत्रीण म्हणून देखील तिची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती म्हणाली होती:"मराठी लोक मेहनत करत नाहीत, त्यांना काम करण्याची मानसिकता नाहीये. परप्रांतीय जर मुंबई सोडून गेले तर मराठी माणसांची अवस्था फार बिकट होईल."या विधानामुळे तिला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. काही वेळातच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांचा संताप उसळला.
मनसैनिकांचा आक्रमक पवित्रा
या विधानानंतर मनसे कार्यकर्ते थेट ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी राजश्री मोरे विरोधात तक्रार दाखल केली. मराठी अस्मितेला अपमानित करणाऱ्या वक्तव्यामुळे तिच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली गेली.
अभिनेत्रीची माफी आणि व्हिडीओ डिलिट
प्रचंड टीका झाल्यानंतर अखेर राजश्री मोरेने तिचा वादग्रस्त व्हिडीओ डिलिट केला आणि इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली."लढाईमध्ये काहीही ठेवलेलं नाही... आयुष्य खूपच लहान आहे," असं तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.


