महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वादाच्या मुद्द्यावर भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआ याने प्रतिक्रिया दिली आहे. निरहुआने म्हटले की, "भाषेवरुन घाणेरडे राजकरण करू नये."

मुंबई : महाराष्ट्रात सध्या मराठी भाषेवरून सुरू असलेला वाद राजकीय स्वरूप घेत आहे. हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने एकत्रित मोर्चा काढल्याने चर्चेला उधाण आलं आहे. अशातच भोजपुरी अभिनेता व गायक दिनेश लाल यादव ऊर्फ ‘निरहुआ’ याने या विषयावर आपलं मत मांडत एक थेट आव्हान दिलं आहे. “मी भोजपुरी बोलतो, जर हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा.”

निरहुआचं ठाकरे बंधूंना थेट आव्हान

पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, निरहुआने शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून म्हटलं, “मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरीच बोलेन. मी मुंबईत राहतो. गरीब माणसांना राज्याबाहेर काढण्याची धमकी देताय, तर मग मला बाहेर काढून दाखवा.”त्याने हे वक्तव्य करत “भाषेवरून तेढ निर्माण करणं हे घाणेरडं राजकारण आहे” अशी टीका केली. भाषेच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणं हे चुकीचं असल्याचंही त्याने म्हटलं.

मनसे नेत्यांचा प्रत्युत्तर 

निरहुआच्या वक्तव्याला मनसेकडून तिखट प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. एका मनसे नेत्याने म्हटलं, "जर दिनेश लाल यादवमध्ये खरंच हिंमत असेल, तर तो महाराष्ट्रात येऊन दाखवावा." त्यांनी असा इशाराही दिला की, इथल्या मातृभाषेला कमी लेखणं खपवून घेतलं जाणार नाही.

भाषिक सौंदर्य टिकवण्याची गरज: निरहुआ

निरहुआ म्हणतो, "भारताचं सौंदर्य विविध भाषांमध्ये आहे. वेगवेगळ्या भाषांतील लोक एकत्र राहत आहेत, हेच खरे सौंदर्य आहे. जर तुम्ही भाषा हे कारण बनवून फूट पाडत असाल, तर तुम्ही देशाच्या एकतेला धक्का देत आहात."

मनसे कार्यकर्त्यांची कारवाई 

या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी मुंबईजवळ एका दुकानदाराला मराठी न बोलल्याबद्दल मारहाण करण्यात आली होती. याशिवाय, गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी "मी मराठी बोलणार नाही" असे जाहीरपणे सांगितल्यानंतर, त्यांच्या कार्यालयाचा काचा फोडण्यात आल्या होत्या. पण नंतर सुशील केडिया यांनी मीडियासमोर मनसेची माफी देखील मागितली.