Nilesh Sable reply Sharad Upadhye: झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून निलेश साबळे यांच्या बाहेर पडण्यावरून सुरू झालेल्या वादावर साबळे यांनी शरद उपाध्ये यांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी कार्यक्रमातून बाहेर पडण्यामागचे खरे कारण सांगितले आहे.
मुंबई : काही दिवसांपासून झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्याचे प्रमुख सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे चर्चेत आहेत. राशीविश्लेषक शरद उपाध्ये यांनी सोशल मीडियावर निलेश साबळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आता खुद्द निलेश साबळे यांनीही व्हिडीओद्वारे शांत पण ठाम प्रत्युत्तर दिलं आहे.
“सोशल मीडियावर उत्तर द्यावं लागेल असं वाटलं नव्हतं”
निलेश साबळे म्हणाले, “मला वाटायचं की सोशल मीडियावर फक्त लोकांना हसवणारे व्हिडीओ द्यावे, पण आज खरं काय घडलं, हे सांगण्यासाठी व्हिडीओ करावा लागतोय. शरद उपाध्ये सर माझ्यासाठी गुरुतुल्य आहेत, पण त्यांनी जराशी माहिती घेतली असती, तर गैरसमज टाळता आले असते.”
"माझ्या मर्जीने मी बाहेर पडलो, डच्चू नाही दिला"
चला हवा येऊ द्या या नव्या पर्वात निलेश साबळे दिसणार नसल्याचं वृत्त पसरलं आणि अनेकांनी त्याला “डच्चू” दिला असं समजलं. मात्र, निलेश साबळे स्पष्टपणे सांगतात की, “झी मराठीकडून अनेक वेळा संपर्क झाला. मी सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तारखा जुळल्या नाहीत म्हणून मीच कार्यक्रमातून बाजूला होण्याची विनंती केली. याचा अर्थ मला काढून टाकलं, असा अजिबात नाही.”
“भाऊ कदमही माझ्यासोबतच सध्या चित्रपटात व्यस्त आहेत”
साबळे यांनी स्पष्ट केलं की, केवळ तेच नव्हे तर अभिनेते भाऊ कदम देखील या नव्या पर्वात दिसणार नाहीत, कारण ते सुद्धा सध्या त्यांच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहेत. “हेही कारण कुणी जाणून घेतलं का?” असा सवाल त्यांनी थेट उपस्थित केला.
"2014 मधील गोष्ट आज 2025 मध्ये?"
शरद उपाध्ये यांनी स्टेजवर अपमान झाल्याचं सांगितल्यावर, साबळे म्हणाले, “हा भाग 2014-15 दरम्यानचा आहे, जेव्हा कार्यक्रम नव्याने सुरू झाला होता. पहिल्या 50 भागांपैकी तो एक. आज जवळपास 10 वर्षांनी त्याचा संदर्भ देणं योग्य आहे का?”
"पाणी विचारलं नाही?, ती चूक माझी नव्हे"
पाण्याबाबत झालेल्या तक्रारीवरही त्यांनी स्पष्ट सांगितलं. “झी मराठीसाठी हा व्यवस्थापन एका वेगळ्या कंपनीमार्फत केलं जातं. सर्वांचे व्यवस्थीत स्वागत, मेकअप रूम्स, पाण्याची सोय याबाबत पूर्ण नियोजन असतं. तुम्हाला मोठी रूम देण्यात आली होती. यात माझी वैयक्तिक भूमिका नव्हती.”


