Rinku Rajguru Pandharpur Wari 2025 : मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने वडिलांसोबत पंढरपूरच्या वारीत सहभाग घेतला. नऊवारी साडीत, टाळ-चिपळ्यांच्या निनादात रिंकूने वारीचा आनंद लुटला आणि हा अनुभव तिने इंस्टाग्रामवर शेअर केला.

मुंबई: महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आणि भक्तीचा महापर्व म्हणजेच आषाढी वारी. दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला लाखो वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायपीट करत मार्गस्थ होतात. टाळ-चिपळ्यांच्या निनादात, हरीनामाच्या गजरात, भजन-कीर्तनाच्या भक्तिभावात हरवून जातात. यंदा या भक्तिमय वातावरणात एक खास चेहरा मिसळला. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू!

रिंकूने यावर्षी वडिलांसोबत पंढरपूरच्या वारीत प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि त्या पवित्र अनुभवाचा खास व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. नऊवारी साडीत, कपाळी गंध, नाकात नथ, हातात टाळ आणि डोक्यावर तुळस घेत पारंपरिक वेशात रिंकू अगदी वारकऱ्यांमध्ये मिसळून गेली होती. पायात ठेका धरत, भक्तिरसात न्हालेली रिंकू आणि तिच्या चेहऱ्यावर दिसणारी भक्तीची झलक सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

 विशेष म्हणजे रिंकू वडिलांसोबत फुगडी खेळताना, आणि इतर महिला वारकऱ्यांमध्ये मनमुराद मिसळून पारंपरिक खेळांमध्ये सहभागी होताना दिसली. हा अनुभव ती इतक्या वर्षांनी पुन्हा जगत होती, हे तिच्याच शब्दांत अधिक प्रभावीपणे उमटलं आहे.

View post on Instagram

तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय

"जय जय राम कृष्ण हरी! मी वयाच्या ४ व्या वर्षी माझ्या बाबांसोबत वारीत गेले होते. आज तब्बल २० वर्षांनी पुन्हा तेच क्षण अनुभवतेय... हे क्षण माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत."

रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. "तुझं साधेपण मनाला भावलं", "खरी कलाकार तीच, जी जमिनीवर पाय ठेवून चालते", अशा कमेंट्सनी तिचा पोस्ट सेक्शन गजबजून गेलाय. विठोबाच्या भक्तीने भारलेली रिंकू आता तिच्या चाहत्यांच्या मनातही आणखी खोलवर घर करत आहे.