या नव्या पर्वामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. या लोकप्रिय शोचा चेहरा, सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे यांची अनुपस्थिती. ते यावेळी सुत्रसंचालक करताना दिसणार नाहीत. मालिकेतही दिसणार नाहीत.

मुंबई - गेल्या दहा वर्षांपासून मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि घराघरात पोहोचलेला कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आता पुन्हा नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण या नव्या पर्वामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. या लोकप्रिय शोचा चेहरा, सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे यांची अनुपस्थिती. ते यावेळी सुत्रसंचालक करताना दिसणार नाहीत. मालिकेतही दिसणार नाहीत.

नव्या पर्वाची टीम पूर्णपणे बदलली असून सूत्रसंचालनाची धुरा आता अभिनेता अभिजीत खांडकेकरकडे दिली गेली आहे. यासोबतच पडद्यामागील दिग्दर्शन आणि संकल्पनेची जबाबदारी अभिनेता प्रियदर्शन जाधव सांभाळणार आहे. यामुळे शोच्या टोनमध्ये आणि सादरीकरणात लक्षणीय बदल पाहायला मिळणार आहेत.

डॉ. निलेश साबळे गेले १० वर्ष ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी होते. त्यांनी केवळ सूत्रसंचालनच नव्हे, तर लेखन, दिग्दर्शन आणि अनेकदा स्किट्समधून अभिनयही केला. मात्र, गेल्या काही काळापासून ते कोणत्याही मोठ्या मालिका किंवा चित्रपटांमध्ये दिसले नाहीत, आणि आता तर त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’चाही निरोप घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

या बदलावर प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये संमिश्र भावना व्यक्त होत आहेत. अनेकांना हा शो डॉ. निलेश साबळेशिवाय अपूर्ण वाटतोय, तर काही प्रेक्षक नवीन टीमकडून नव्या उंचीची अपेक्षा करत आहेत.

या शोमधील कलाकार, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांनी प्रेक्षकांना अक्षरशः हसून हसून वेडे केलं. त्यांच्या भन्नाट कॉमिक टायमिंग आणि सशक्त अभिनयामुळे 'चला हवा येऊ द्या' हा केवळ एक शो न राहता, मराठी संस्कृतीचा एक भाग बनला.

मात्र, गेल्या काही वर्षांत शोमध्ये तोचतोचपणा, विनोदांमधील सातत्याचा अभाव आणि अनावश्यक लांबणी यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. काही प्रेक्षकांनी शोकडे पाठ फिरवली आणि टीआरपीतही घट झाली. त्याच दरम्यान अनेक इतर कॉमेडी शो मराठी टेलिव्हिजनवर उभारी घेत होते.

नवीन टीमसह सुरू होणाऱ्या या सीझनकडून प्रेक्षकांची अपेक्षा निश्चितच वाढली आहे. डॉ. निलेश साबळेची अनुपस्थिती नक्कीच जाणवणार असली तरी अभिजीत खांडकेकर आणि प्रियदर्शन जाधव यांच्याकडून एक वेगळा आणि ताजातवाना अनुभव मिळेल, अशी आशा आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, डॉ. निलेश साबळे एका एपिसोडसाठी अंदाजे १ ते १.५ लाख रुपये मानधन घेत होते, जे त्यांच्या लोकप्रियतेचा आणि योगदानाचा परिपाक होता.

आता पाहायचं हे की, ‘चला हवा येऊ द्या’ या नवीन स्वरूपात आपली जुनी प्रतिष्ठा पुन्हा मिळवू शकेल का? की प्रेक्षक यालाही ‘हवा’ देणार? याचं उत्तर लवकरच मिळेल!