जेष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. या बातमीमुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. 

ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे (Bal Karve) यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं. चिमणराव-गुंड्याभाऊ मालिकेतल्या ‘गुंड्याभाऊ’ या अजरामर भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले. या मालिकेत दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्याचप्रमाणे, ‘बन्याबापू’ चित्रपटातील बापूची भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहील. त्यांच्या जाण्यानं मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

पेशाने इंजिनिअर पण मनाने अभिनेता

बाळ कर्वे हे पेशानं इंजिनिअर होते, मात्र अभिनयाची ओढ त्यांना लहानपणापासूनच होती. त्यांचं खरं नाव ‘बाळकृष्ण’ होतं. पण सर्वांना प्रिय असलेलं ‘बाळ’ हेच नाव पुढे त्यांच्या लोकप्रियतेचं कारण ठरलं. रंगभूमीवरील त्यांचे गुरू म्हणजे सुप्रसिद्ध रंगकर्मी विजया मेहता. भारतीय टेलिव्हिजनवरील पहिल्या मालिकेत ‘चिमणराव’ मध्ये त्यांनी गुंड्याभाऊंची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘स्वामी’ मालिकेतील गंगोबा तात्या ही भूमिकाही त्यांच्या अभिनयाची वेगळी ओळख ठरली.

नाटकं, मालिका आणि सिनेमांत गाजलेल्या भूमिका

बाळ कर्वे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दर्जेदार नाटकं, मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘सूर्याची पिल्ले’, ‘रथचक्र’, ‘तांदुळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

मालिकांमध्ये ‘प्रपंच’, ‘राधा ही बावरी’, ‘वहिनीसाहेब’, ‘उंच माझा झोका’ या लोकप्रिय ठरल्या. ‘जैत रे जैत’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘सुंदरा सातारकर’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘चटक चांदणी’, ‘बन्याबापू’ या चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या.

हिंदी सिनेमातही ठसा उमटवला

बाळ कर्वेंनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमातही काम केलं. सई परांजपे यांच्या ‘कथा’ या सिनेमात त्यांनी भूमिका केली होती. त्यांच्यावर चित्रित झालेलं मराठी मनोरंजन विश्वातील गाजलेलं गाणं ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’ आजही लोकांच्या मनात घर करून आहे.

हरहुन्नरी अभिनेत्याच्या जाण्याने शोककळा

बाळ कर्वे यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे, मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे, नम्र स्वभावामुळे आणि सहकलाकारांशी जुळवून घेण्याच्या वृत्तीमुळे ते सर्वांचे लाडके होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी कला-सृष्टीत शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.