मुंबईच्या मानखुर्द ब्रिजवर तब्बल ५ तास ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने व्हिडिओ शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे. क्रेन कोसळून झालेल्या अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
Sonali Kulkarni Traffic Jam Viral Video: मुंबईला अनेकदा 'कधीही न थांबणारं शहर' (City That Never Stops) म्हटलं जातं, पण हेच शहर कधीकधी तासन्तास एकाच जागी थांबतं, हेदेखील तितकंच खरं आहे. विशेषतः पाऊस, रस्त्यांची कामं आणि अचानक होणारे अपघात या शहराच्या वेगाला ब्रेक लावतात. यावेळी या वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्यांसोबतच प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही करावा लागला. तिने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर करत थेट सिस्टीमवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
मानखुर्दमध्ये ५ तास अडकून पडली सोनाली कुलकर्णी
मंगळवारी रात्री मुंबईहून पुण्याला जात असताना सोनाली कुलकर्णी मानखुर्द ब्रिजवर प्रचंड ट्रॅफिक जाममध्ये अडकली. तिने एक व्हिडिओ शेअर करून सांगितलं की, ती जवळपास ५ तास एकाच ठिकाणी अडकून होती. व्हिडिओमध्ये तिने म्हटलंय की, 'ना पुढे जायला रस्ता होता, ना मागे फिरण्याचा पर्याय.' तिच्या चारही बाजूंना गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती इतकी गंभीर होती की, वाहतूक नियंत्रक पथकही जाम कधी सुटेल, हे ठामपणे सांगू शकत नव्हतं.
“खूपच भयानक अनुभव होता” - सोनाली कुलकर्णी
सोनालीने व्हिडिओमध्ये आपली नाराजी व्यक्त करत म्हटलं की, 'एकाच जागी सलग ५ तास अडकून राहणं हा खूपच भयानक अनुभव आहे.' तिने प्रशासनाला आवाहन केलं की, प्रवाशांना किमान परिस्थितीची नेमकी माहिती तरी द्यावी, जेणेकरून लोक मानसिकदृष्ट्या तयार राहतील किंवा दुसरा मार्ग निवडू शकतील.
एवढा मोठा जाम का लागला?
प्राथमिक माहितीनुसार, मानखुर्दजवळ रस्त्याच्या कामादरम्यान एका क्रेनचा भाग कोसळला. या दुर्दैवी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यूही झाला. प्रशासनाकडून तो कोसळलेला भाग हटवण्याचं काम सुरू होतं, ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आणि पाहता पाहता गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
सोशल मीडियावर लोकांचा संताप
सोनाली कुलकर्णीच्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर सर्वसामान्य मुंबईकरांनीही आपला संताप व्यक्त केला. अनेक युजर्सनी लिहिलं की, ही समस्या काही नवीन नाही, पण प्रत्येक वेळी प्रशासनाची तयारी अपुरीच दिसते. लोकांच्या मते, मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन हे एक मोठं आव्हान बनलं आहे, विशेषतः ज्या भागात सतत बांधकामं सुरू आहेत.


