Pranit More Apology : ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कॉमेडियन प्रणित मोरे यांनी अखेर सार्वजनिक माफी मागितली आहे. यासंबंधित एक व्हिडीओ सोशल प्रणितने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Pranit More Apology : ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड वाद निर्माण झाल्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांनी अखेर माफी मागितली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी संपूर्ण घडामोडींवर भूमिका स्पष्ट करत, शोदरम्यान झालेल्या संवादात आपण योग्य वेळी हस्तक्षेप करू शकलो नाही, ही गंभीर चूक असल्याचे मान्य केले. या प्रकरणामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्या सर्वांची त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

‘हशात वाहवत गेलो, निर्णय चुकला’

प्रणित मोरे यांनी व्हिडिओत सांगितले की, शोदरम्यान संबंधित व्यक्ती अनेक आक्षेपार्ह आणि महिलांचा अवमान करणारी वक्तव्ये करत होती. मात्र, प्रेक्षकांच्या हशामुळे आपण त्या वातावरणात वाहवत गेलो आणि योग्य वेळी त्याला थांबवू शकलो नाही. “मी त्याला त्याच क्षणी रोखू शकलो असतो किंवा ठाम भूमिका घेऊ शकलो असतो. मात्र तसे झाले नाही. तो माझ्या निर्णयातील मोठा दोष होता,” असे मोरे यांनी स्पष्ट केले.

 ‘370 रुपयांच्या बिर्याणी’चा वाद नक्की काय?

वादाची सुरुवात हिमांशू जांगरा नावाच्या व्यक्तीने प्रणित मोरे यांच्या शोमध्ये सांगितलेल्या एका डेटिंग अनुभवातून झाली. त्याने एका महिलेसोबत डेटवर गेल्यानंतर तिच्यावर 370 रुपयांची चिकन बिर्याणी खर्च केल्याचे सांगत, त्याबदल्यात काही अपेक्षा ठेवली होती, असे वक्तव्य केले. त्यानंतर त्याने संबंधित महिलेवर दबाव टाकल्याचा आणि तिच्या नकारानंतरही आग्रह धरल्याचा दावा केला. या संपूर्ण कथनावर प्रेक्षकांकडून हशा आणि टाळ्या मिळाल्याने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

व्हायरल क्लिपमुळे वाढला वाद

या कार्यक्रमातील व्हिडिओ क्लिप स्वतः प्रणित मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. काही तासांतच ती व्हायरल झाली आणि देशभरात चर्चेचा विषय ठरली. अनेक कंटेंट क्रिएटर्स, महिला हक्क कार्यकर्ते आणि सोशल मीडिया युजर्सनी या संवादावर टीका करत, महिलांविषयी अपमानास्पद आणि असंवेदनशील दृष्टिकोनाला व्यासपीठ दिल्याचा आरोप केला. वाद वाढताच गुरुग्रामस्थित स्टारविक डिझाइन या कंपनीने हिमांशू जांगरा याची सेवा समाप्त केल्याची घोषणा केली.

राष्ट्रीय महिला आयोगाची दखल; सरकारचीही प्रतिक्रिया

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) हरियाणा पोलिसांच्या महासंचालकांना पत्र पाठवून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाच्या मते, व्हायरल व्हिडिओमधील वक्तव्ये महिलांविरोधातील जबरदस्तीच्या वर्तनाचे समर्थन करणारी आणि असहमतीकडे दुर्लक्ष करणारी असल्याचे दिसते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर प्रतिक्रिया देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा असल्याचे सांगितले, मात्र कोणालाही मर्यादा ओलांडण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.

‘ही माझ्यासाठी शिकवण'

वादानंतर प्रणित मोरे यांनी भविष्यात अधिक जबाबदारीने काम करण्याचे आश्वासन दिले आहे. “या घटनेतून मी खूप काही शिकलो आहे. मी स्वतःवर काम करत आहे. माझ्या कंटेंटमध्येही याचा सकारात्मक परिणाम दिसेल. लोकांनी मला एक संधी द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले. सध्या या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेत आपण पूर्ण सहकार्य करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

View post on Instagram