नायजेरियातील अबुजा येथे ९ जणांना घेऊन जाणाऱ्या एका प्रायव्हेट जेटचा दरवाजा हवेत ३५०० फुटांवर असताना अचानक निखळला. ट्रायटन एव्हिएशनचे हे विमान लागोसला जात होते. सुदैवाने वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंग केल्याने मोठा अनर्थ टळला.
नायजेरियात ९ जणांना घेऊन जाणाऱ्या एका प्रायव्हेट जेटला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. हवेत साधारण ३,५०० फूट उंचीवर असताना या विमानाचा एक दरवाजा अचानक निखळून पडला. यानंतर वैमानिकांनी तातडीने 'मेडे' (Mayday) कॉल दिला आणि विमान पुन्हा अबुजा विमानतळाकडे वळवलं. तिथे आपत्कालीन पथकांना आधीच अलर्टवर ठेवलं होतं. सुदैवाने या घटनेत सर्व ६ प्रवासी आणि ३ क्रू मेंबर्स सुरक्षित बचावले आहेत.
हे विमान ट्रायटन एव्हिएशन कंपनीचं 'चॅलेंजर ६०४' (Challenger 604) होतं. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी हे जेट अबुजावरून लागोसला जात होतं. नामदी अझिकीवे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात हा धक्कादायक प्रकार घडला.
नायजेरियन सेफ्टी इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (NSIB) ने दिलेल्या माहितीनुसार, विमान विमानतळापासून सुमारे तीन नॉटिकल मैल दूर होतं आणि ३,५०० फुटांवरून वर जात होतं. त्याचवेळी विमानाचा दरवाजा मुख्य भागापासून वेगळा झाला आणि क्रूने इमर्जन्सी घोषित केली.
विमानाचा दरवाजा गायब, वैमानिकांचा 'मेडे' कॉल
एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सनी वैमानिकांना लगेच अबुजाला परतण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे, विमानतळावर अग्निशमन दल, बचाव पथक आणि वैद्यकीय पथकं विमानाच्या लँडिंगसाठी सज्ज होती.
नायजेरियन मीडियाच्या रिपोर्टनुसार, उड्डाणादरम्यान दरवाजा उघडल्याचं वैमानिकांनी सुरुवातीला कळवलं होतं. पण तो दरवाजा विमानाला लागून आहे की पडला, याची त्यांना खात्री नव्हती. परतत असताना क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना विमानाची पाहणी करण्याची विनंती केली. एका कंट्रोलरने दुर्बिणीतून पाहण्याचा प्रयत्नही केला, पण विमानाची पोझिशन आणि अँगलमुळे दरवाजा जागेवर आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
अशा गोंधळाच्या स्थितीतही वैमानिकांनी अबुजा विमानतळाच्या रनवे २२ वर विमानाचं सुरक्षित लँडिंग केलं. या घटनेत विमानातील कोणालाही दुखापत झाली नसल्याचं अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केलं.
निखळलेला दरवाजा सापडला, तपास सुरू
विमानाचा हा निखळलेला दरवाजा नंतर अबुजाजवळील एका शेतात सापडला. तपास अधिकाऱ्यांनी हा दरवाजा ताब्यात घेतला असून, पुढील तपासणीसाठी तो ब्युरोच्या हँगरमध्ये सुरक्षित ठेवल्याची माहिती NSIB ने दिली आहे.
NSIB चे महासंचालक कॅप्टन अलेक्स बादेह ज्युनियर यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाड, मेंटेनन्सचा अभाव की आणखी कोणत्या कारणामुळे दरवाजा निखळला, याचा तपास अधिकारी करत आहेत. अद्याप कोणतंही ठोस कारण समोर आलेलं नाही. सध्या विमानाची आणि सापडलेल्या दरवाजाची कसून तपासणी सुरू असून, लवकरच याबद्दलचे अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे.






