फ्लाईदुबई विमान हायजॅक आणि क्रॅश होण्यापासून वाचवताना सहवैमानिकाच्या हल्ल्यात जखमी झालेले भारतीय वंशाचे पायलट स्मित मच्छार यांनी रुग्णालयातून या थरारक घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे.

दुबई : फ्लाईदुबई विमान हायजॅक आणि क्रॅश होण्यापासून वाचवताना सहवैमानिकाच्या हल्ल्यात जखमी झालेले भारतीय वंशाचे पायलट स्मित मच्छार यांनी या घटनेचा थरार सांगितला आहे.

स्मित यांनी रुग्णालयातून एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, 'विमान उड्डाण करून २ तास झाले होते. मी पहिल्यांदाच ओमानच्या सहवैमानिकासोबत उड्डाण करत होतो. यावेळी इस्रायलहून माझ्यासोबत परत येणारे आणखी एक पायलट मला भेटण्यासाठी कॉकपिटमध्ये आले होते. त्याचवेळी ओमानचा पायलट वॉशरूमला जाऊन परत आला. आल्यावर त्याने दुसऱ्या पायलटला प्रार्थना करण्यासाठी जागा सोडायला सांगितली.'

त्याच्या बोलण्यात काहीच संशयास्पद वाटलं नाही

'त्याच्या या बोलण्यात आम्हाला काहीच संशयास्पद वाटलं नाही. मी विमानावर लक्ष ठेवून होतो. सहवैमानिक माझ्या मागे होता. काही क्षणांतच माझ्या डोक्यावर जोरात वार झाला. सुरुवातीला मला वाटलं की विमानाचा वरचा भाग तुटून माझ्या डोक्यावर पडला असावा. पण नंतर लक्षात आलं की तो माझ्यावर झालेला हल्ला होता.'

'त्यावेळी माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे आणखी हल्ले रोखणे ही होती. त्यामुळे मी माझा सीटबेल्ट काढला आणि बाहेर असलेल्या दुसऱ्या पायलटला मदतीसाठी हाक मारली. सोबतच कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी पहिल्यांदा बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आल्यावर मी कसातरी सावरलो, दरवाजा उघडला आणि बाहेर पडलो. पुढचा सगळा इतिहास आहे. त्या क्षणी माझ्या डोक्यात एकच विचार आला होता, 'स्मित काहीतरी कर, तू असा मरू शकत नाहीस.' स्वतःला अशी हिंमत देत मी यातून वाचलो,' असं स्मित यांनी सांगितलं.