फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेने नवा इतिहास रचला आहे. त्याने लिओनेल मेस्सीचा ११ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला. युईएफए चॅम्पियन्स लीगमध्ये रोमाविरुद्धच्या सामन्यात गोल करत एम्बाप्पेने रिअल माद्रिदला विजय मिळवून दिला आणि मेस्सीचा विक्रमही मोडीत काढला.
Kylian Mbappe: फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने लिओनेल मेस्सीचा ११ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला. युईएफए चॅम्पियन्स लीगमध्ये रिअल माद्रिद रोमाविरुद्ध खेळायला उतरली होती. या सामन्यात गोल करून एम्बाप्पेने रिअल माद्रिदला विजय तर मिळवून दिलाच, पण सोबतच मेस्सीचा जुना विक्रम मोडून एक नवा टप्पा गाठला. याशिवाय, एर्लिंग हालंडनेही मेस्सीचा एक विक्रम मोडला आहे. रोमाविरुद्धच्या या सामन्यात रिअल माद्रिद सुरुवातीला पिछाडीवर होती, पण नंतर त्यांनी ४-३ असा विजय मिळवला. सामन्याच्या २५व्या मिनिटाला एम्बाप्पेने गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. विशेष म्हणजे, एम्बाप्पेच्या करिअरमधला हा युईएफए चॅम्पियन्स लीगमधील १००वा सामना होता.
एम्बाप्पेने रचला विश्वविक्रम! मोडला मेस्सीचा रेकॉर्ड
वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी त्याने हा टप्पा गाठला आहे. फ्रान्सचा कर्णधार असलेला एम्बाप्पे हा विक्रम करणारा जगातील सर्वात तरुण फुटबॉलपटू ठरला आहे. याआधी हा विश्वविक्रम फक्त मेस्सीच्या नावावर होता. २०१५ मध्ये, वयाच्या २८व्या वर्षी मेस्सीने रोमाविरुद्धच आपला चॅम्पियन्स लीगमधील १००वा सामना खेळला होता. त्यानंतर पुढच्याच वर्षी, वयाच्या १७व्या वर्षी एम्बाप्पेने मोनॅकोकडून चॅम्पियन्स लीगमध्ये पदार्पण केले होते. आकडेवारीनुसार, चॅम्पियन्स लीगच्या १०० सामन्यांमध्ये एम्बाप्पेने एकूण ७२ गोल केले आहेत. तर याच टप्प्यावर मेस्सीच्या नावावर ७७ गोल होते. या बाबतीत विश्वविक्रम रॉबर्ट लेवांडोस्कीच्या नावावर आहे. त्याने १०० सामन्यांत ८१ गोल केले आहेत. या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो चौथ्या स्थानावर असून त्याने १०० सामन्यांत ६४ गोल केले आहेत.
फ्रेंच स्टारचा नवा टप्पा
दुसरीकडे, पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) कडून मँचेस्टर सिटीला ४-२ असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात सिटीसाठी दोन्ही गोल एर्लिंग हालंडने केले. सध्याच्या चॅम्पियन्स लीगमध्ये ६० सामने खेळून हालंडच्या गोलची संख्या ६१ वर पोहोचली आहे. युईएफएच्या माहितीनुसार, २६ वर्षे आणि ८५ दिवस वयाचा असताना चॅम्पियन्स लीगमध्ये ६० गोल करण्याचा विक्रम हालंडने केला. त्याने अवघ्या एका दिवसाच्या फरकाने मेस्सीला मागे टाकले आहे. मेस्सीने हा विक्रम २६ वर्षे आणि ८६ दिवस वयाचा असताना केला होता.






