सार

सोमालियामध्ये एका जहाजाचे अपहरण करण्यात आले आहे. या जहाजावर जवळपास 15 भारतीय क्रू मेंबर्स देखील आहेत. या जहाजाचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदलाने कारवाई सुरू केली आहे.

Mv Lila Norfolk Ship Hijacked Somalia : सोमालियामध्ये MV LILA NORFOLK नावाच्या जहाजाचे अपहरण करण्यात आले आहे. या जहाजामध्ये 15 भारतीय क्रू मेंबर्सचा समावेश आहे. अपहरण झालेल्या जहाजाचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदलाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय नौदलाला क्रू मेंबर्ससोबत संवाद साधण्यात यश मिळाले आहे. सध्या  नौदल अपहरण झालेल्या जहाजावर लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमालियामध्ये अपहरण करण्यात आलेल्या जहाजावर लायबेरिया देशाचा ध्वज होता.  

आयएनएस चेन्नई अपहरण झालेल्या जहाजाच्या दिशेने रवाना

सोमालियाच्या किनारपट्टीवर जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदलाने आयएनएस चेन्नई युद्धनौका जहाजाच्या दिशेने रवाना केली आहे. भारतीय नौदलाने क्रू मेंबर्सशी संपर्क स्थापित केला असून या जहाजावर पाळत ठेवली जात आहे.

जहाजाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय अन्य यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, या भागातील व्यावसायिक जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ते इंटरनॅशनल पार्टनर्स आणि मित्र देशांच्या संपर्कातही आहेत.

सर्व्हिलिअन्स एअरक्राफ्ट व युद्धनौकेकडून प्रयत्न

अपहरण झालेल्या जहाजाच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नौदलाकडून सर्व्हिलिअन्स एअरक्राफ्ट, युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत; ज्याद्वारे अधिकाऱ्यांना माहिती मिळण्यास मदत होत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, लायबेरिया देशाचा ध्वज असणाऱ्या जहाजावरून यूकेएमटीओ पोर्टलला मेसेज पाठवण्यात आला आहे. 

4 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी पाच ते सहा सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला आणि जहाजात शिरले, अशी माहिती या मेसेजद्वारे समोर आली आहे. यानंतर नौदलाकडून आयएनएस चेन्नई युद्धनौका अपहरण झालेल्या जहाजाकडे ताताडीने रवाना करण्यात आली. जहाजाची लवकरात लवकर सुटका करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

आणखी वाचा : 

Japan Airlines Plane Accident : 300 प्रवासी असलेले विमान लँड होताच अचानक लागली भीषण आग, अपघाताचा VIDEO VIRAL

Argentina President Javier Milei : अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांनी स्टेजवरच गर्लफ्रेंडचे चुंबन घेतले, VIDEO VIRAL

विमानात गर्भवतीसोबत सीट बदलण्यास त्याने दिला नकार, टीकेऐवजी नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा