UAE Arrests: AI चा वापर करून सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि अफवा पसरवल्याबद्दल UAE मध्ये 35 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, यात 17 जण भारतीय आहेत. या सर्वांवर फास्ट-ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुबई: सध्याच्या तणावाच्या काळात सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्यांविरोधात UAE ने अत्यंत कठोर पाऊल उचललं आहे. AI (Artificial Intelligence) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून अफवा पसरवल्याच्या आरोपाखाली UAE च्या ॲटर्नी जनरल यांनी 35 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. यात 17 भारतीयांचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मवर कडक नजर
या सर्वांवर आता फास्ट-ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बनावट व्हिडिओ वापरून चुकीची माहिती पसरवल्याचा त्यांच्यावर मुख्य आरोप आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर कडक नजर ठेवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या लोकांवर लोकांमध्ये गैरसमज आणि भीती निर्माण करून देशाची सुरक्षा धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी इतर देशांमधील लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यांचे व्हिडिओ UAE मधील असल्याचे भासवून व्हायरल केले. तसेच, लोकांवर हल्ले होत असल्याचे खोटे व्हिडिओही पसरवले. एवढंच नाही, तर AI चा वापर करून UAE मधील प्रसिद्ध आणि महत्त्वाची ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याचे बनावट व्हिडिओ तयार करून ते पसरवल्याचाही आरोप आहे.
या गुन्ह्यासाठी आरोपींना किमान एक वर्षाचा तुरुंगवास आणि 1 लाख दिरहमपर्यंतचा दंड होऊ शकतो. याआधी, अबुधाबी पोलिसांनी अशाच प्रकारे व्हिडिओ चित्रीकरण केल्याबद्दल 45 जणांना अटक केली होती.


