Indian Oil Tanker Jag Laadki Escapes Fujairah Drone Attack : इराणने हल्ला केलेल्या UAE मधील फुजैरा ऑइल टर्मिनलवरून 'जग लाडकी' हे भारतीय जहाज सुखरूप बाहेर पडलं आहे. भारतीय नौदलाच्या सुरक्षेत हे जहाज मायदेशी येत असून, त्यावरील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली आहे. 

Indian Oil Tanker Jag Laadki Escapes Fujairah Drone Attack : इराणने हल्ला केलेल्या संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) फुजैरा ऑइल टर्मिनलवरून 'जग लाडकी' हे भारतीय जहाज अखेर सुखरूप बाहेर पडलं आहे. ज्यावेळी टर्मिनलवर हल्ला झाला, तेव्हा हे जहाज तिथे तेल भरत होतं. आता हे जहाज सुरक्षितपणे भारताच्या दिशेने रवाना झालं असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली आहे.

१४ मार्च रोजी, ज्यावेळी इराणने फुजैरा टर्मिनलवर हल्ला केला, तेव्हा 'जग लाडकी' हे भारतीय जहाज तिथे कच्चं तेल (crude oil) भरत होतं. आता फुजैरा येथून निघालेलं हे जहाज आणि त्यावरील सर्व भारतीय खलाशी पूर्णपणे सुरक्षित आहेत, असं पेट्रोलियम विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

फुजैरामधील हल्ल्यातून बचावलेल्या या भारतीय ऑइल टँकरला भारतीय नौदल सुरक्षा देत आहे. आखाती प्रदेशात भारतीय टँकर्स आणि जहाजांच्या सुरक्षेसाठी खास युद्धनौकाही तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या आखाती प्रदेशातून २४ भारतीय जहाजं प्रवास करत असल्याची माहिती जहाज वाहतूक मंत्रालयाने दिली. यापैकी दोन जहाजं एलपीजी गॅस घेऊन मुंद्रा आणि कांडला बंदरांच्या दिशेने येत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती प्रदेशात सुमारे २३,००० भारतीय खलाशी अडकले असण्याची शक्यता आहे. त्यापैकी २७६ जणांना वेगवेगळ्या कंपन्यांनी आतापर्यंत बाहेर काढलं आहे. आणखी भारतीय टँकर्सना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे आणण्याबाबत चर्चा सुरू आहे.

शनिवारी UAE मधील फुजैरा ऑइल टर्मिनलवर हल्ला झाला होता. फुजैरा बंदरातील प्रमुख तेल टर्मिनल्सना लक्ष्य करून इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालं. संरक्षण दलांनी एक ड्रोन पाडल्यानंतर त्याचे अवशेष खाली पडून मोठी आग लागली होती. यामुळे तेल निर्यातीवरही काही प्रमाणात परिणाम झाला.