सार

Earthquake in Japan : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. यानंतर येथे त्सुनामीचाही इशारा जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता समुद्रकिनारी परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे.

Earthquake in Japan : जपान देशामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर येथे त्सुनामीचाही इशारा जारी करण्यात आला आहे. 

खबरदारी म्हणून समुद्रकिनारी परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी वर्ष 2011मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे जपानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते

जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

जपानमधील मेट्रोलॉजिकल एजन्सीकडून त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पाच मीटर म्हणजेच 16 फूट उंचीच्या लाटा उसळू शकतात. यामुळे किनारपट्टी भागातील इशिकावा, निगाता आणि तोयामा येथील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. 

जपानमधील न्यूज एजन्सी NHKने दिलेल्या वृत्तानुसार, समुद्रामध्ये उंच लाटा उसळतील आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण जपानमध्ये अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

वर्ष 2011मध्ये त्सुनामीने केला विध्वंस

जवळपास 12 वर्षांपूर्वी म्हणजे वर्ष 2011मध्ये जपान देशात त्सुनामी आली होती. यामध्ये 16 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या नैसर्गिक संकटामध्ये फुकुशिमा अणु प्रकल्पही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. संपूर्ण जगाने ही सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती असल्याचे म्हटले होते. त्यावेळेस समुद्रात सुमारे 10 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या, ज्यामुळे जपान देशाचे प्रचंड नुकसान झाले होते.

भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर जारी 

जपानमधील भारतीय दूतावासाने सोमवारी (1 जानेवारी 2024) झालेल्या भूकंपानंतर तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. याशिवाय आपत्कालीन नियंत्रण कक्षही देखील स्थापन करण्यात आले आहे.

आणखी वाचा :

विमानात गर्भवतीसोबत सीट बदलण्यास त्याने दिला नकार, टीकेऐवजी नेटकऱ्यांनी दिला पाठिंबा

महिलेच्या डोळ्यातून काढले 60 जिवंत किडे, डॉक्टरांनाही बसला धक्का

US Crime : कोण आहे प्रियंका तिवारी? जिने अमेरिकेत स्वतःच्याच 10 वर्षीय मुलाची केली हत्या, कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह