चीनमधील एका नव्या प्रयोगात हे सिद्ध झालंय की, माणसाच्या मदतीशिवाय रोबोट्स साधी आणि रोजची कामंही नीट करू शकत नाहीत.

मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि रोबोट्स माणसांच्या नोकऱ्या खातील अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे. पण चीनमधल्या एका नव्या प्रयोगाने वेगळंच वास्तव समोर आणलंय. माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय रोबोट्स साधी कामंही करू शकत नाहीत, हे यातून स्पष्ट झालंय.

चीनची रोबोटिक्स कंपनी 'Agibot' ने नुकताच शांघायच्या झुहुई (Xuhui) जिल्ह्यात एका दुकानात ६ ह्युमनॉइड रोबोट्सवर २४ तासांचा प्रयोग केला. या प्रयोगाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आलं. दिवसाच्या गर्दीपासून ते रात्रीच्या शिफ्टपर्यंत दुकानातील कामं हे रोबोट्स कसे हाताळतात, हे यात पाहण्यात आलं.

"Robots Never Clock Out" (रोबोट्स कधीही सुट्टी घेत नाहीत) असं या चॅलेंजचं नाव होतं. खऱ्याखुऱ्या परिस्थितीत हे रोबोट्स दुकानाची जबाबदारी किती चांगल्या प्रकारे पार पाडतात, हे तपासणं हा यामागचा उद्देश होता.

या २४ तासांत ६ रोबोट्सनी मिळून एकूण १,७३० कामं पूर्ण केली. यात ६८३ ग्राहकांचं स्वागत, ३६९ वस्तू आणून देणं, आणि १४७ कॉफी बनवण्याच्या कामांचा समावेश होता. याशिवाय १२६ हॉट-फूड ऑर्डर्स, २७७ वेळा शेल्फ तपासणं आणि सामान भरणं, तसंच १२८ वेळा टेबल साफ करण्याचं काम त्यांनी केलं.

Scroll to load tweet…

हा प्रयोग दिवसाच्या चार वेगवेगळ्या टप्प्यांत झाला: दुपारची गर्दी, संध्याकाळची गर्दी, रात्रीचं काम आणि सकाळची नाश्त्याची वेळ. वेगवेगळ्या कामांचा ताण आणि ग्राहकांच्या मागण्या रोबोट्स कसे हाताळतात, हे कंपनीला पाहायचं होतं.यातल्या ४ रोबोट्सनी आपलं काम व्यवस्थित केलं. पण साफसफाई आणि शेल्फ लावण्यासाठी नेमलेले २ रोबोट्स मात्र सपशेल फेल ठरले.

ITHome च्या रिपोर्टनुसार, साफसफाई करणाऱ्या रोबोटला वाटेत एक भरलेली कचराकुंडी दिसली आणि तो गोंधळला. ती उचलण्याऐवजी तो आपला रस्ता चुकला, दुकानाच्या बाहेर गेला आणि परत आपल्या जागेवर आलाच नाही.

दुसऱ्या रोबोटला शेल्फ तपासण्याचं आणि सामान भरण्याचं काम दिलं होतं. पण त्याच्यात 'पुढाकार घेण्याची वृत्ती' नव्हती आणि तो दुकानाच्या वेगाशी जुळवून घेऊ शकला नाही. स्वतःहून वस्तू ओळखून त्या जागी ठेवण्यात तो अपयशी ठरला.

माणसाची गरज अजूनही आहेच

ह्युमनॉइड रोबोटिक्समध्ये कितीही प्रगती झाली असली, तरी शारीरिक कामांसाठी मशिन्सना अजूनही माणसाची गरज लागतेच, हे या प्रयोगाने दाखवून दिलं. AI सिस्टीम माहितीवर प्रक्रिया करून निर्णय घेऊ शकते, पण प्रत्यक्ष हार्डवेअरवर नियंत्रण मिळवणं हे अजूनही एक मोठं आव्हान आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेतील 'Dimensional' या स्टार्टअप कंपनीनेही असाच एक अनुभव शेअर केला होता. त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या रस्त्यांवर त्यांच्या रोबोट कुत्र्यांना फिरवण्यासाठी माणसांना नोकरीवर ठेवलं होतं.

Dimensional चे संस्थापक स्टॅश पोमिचटर (Stash Pomichter) यांनी सांगितलं की, शहरातील रस्त्यांवर रोबोट्सना एकट्याने फिरता यावं यासाठी त्यांनी डॉग वॉकर्सना कामावर ठेवलं होतं. माणसाच्या मदतीशिवाय फिजिकल हार्डवेअर कंट्रोल करताना AI ला किती अडचणी येतात, हे या प्रयोगातून समोर आलं.

"आमच्या डॉग-वॉकिंग प्रयोगातून हे स्पष्ट झालं की, हार्डवेअर कंट्रोल करण्याच्या बाबतीत AI एजंट्स अजूनही खूप मागे आहेत," असं पोमिचटर म्हणाले.

या कंपनीने चीन, जर्मनी आणि अमेरिकेतील उत्पादकांकडून १०० रोबोट कुत्रे आणि ५० ह्युमनॉइड रोबोट्स विकत घेतले आहेत. सॅन फ्रान्सिस्कोच्या रस्त्यांवर दिसलेले २,००० डॉलर्सचे हे रोबोट कुत्रे चीनच्या 'Unitree' या रोबोटिक्स कंपनीकडून खरेदी करण्यात आले होते.