WhatsApp व्हॉट्सॲप युझर्सच्या सुरक्षेसाठी एक नवीन फीचर आणत आहे. या फीचरमुळे अनोळखी नंबरवरून मेसेज आल्यास, तो नंबर कोणत्या देशाचा आहे आणि तो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहे की नाही, अशी माहिती देणारा एक अलर्ट मेसेज दिसेल. वाढत्या सायबर फसवणुकीपासून आणि स्पॅम मेसेजपासून युझर्सना वाचवणे हा यामागे उद्देश आहे.
जगातलं सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप असलेलं व्हॉट्सॲप आपल्या युझर्सची प्रायव्हसी आणि सेफ्टी अधिक मजबूत करण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असतं. सायबर फ्रॉड आणि स्पॅम मेसेजच्या वाढत्या घटना पाहता, आता व्हॉट्सॲप एका नवीन सेफ्टी फीचरची टेस्टिंग करत आहे. या फीचरमुळे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजबद्दल युझर्सना आधीच सावध केलं जाईल.

मिळणार एक खास वॉर्निंग
व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo ने याबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, जेव्हा तुम्हाला एखाद्या सेव्ह न केलेल्या नंबरवरून मेसेज येईल, तेव्हा चॅट उघडण्यापूर्वीच व्हॉट्सॲप तुम्हाला एक खास वॉर्निंग मेसेज दाखवेल. यामुळे तो नंबर किती विश्वासार्ह आहे, याचा अंदाज तुम्हाला आधीच येईल.
या वॉर्निंग मेसेजमध्ये तो फोन नंबर कोणत्या देशात रजिस्टर आहे, तो नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह आहे की नाही, आणि मेसेज पाठवणारी व्यक्ती तुमच्यासोबत कोणत्या कॉमन ग्रुपमध्ये आहे का, ही सगळी माहिती दिसेल. इतकंच नाही, तर 'घोटाळेबाज तुमची वैयक्तिक माहिती, पासवर्ड मिळवण्याचा किंवा पैसे पाठवायला लावण्याचा प्रयत्न करू शकतात,' असा एक सेफ्टी अलर्टही तुम्हाला दिसेल.
ही वॉर्निंग पाहिल्यानंतर युझरला चॅट सुरू ठेवायचं की नाही, हे ठरवता येईल. विशेष म्हणजे, तुम्ही काय निर्णय घेतला हे मेसेज पाठवणाऱ्याला कळणार नाही. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता निर्णय घेणं सोपं होईल.
गेल्या काही काळात व्हॉट्सॲपवरून होणारे ऑनलाइन फ्रॉड खूप वाढले आहेत. बनावट नोकरीच्या ऑफर्स, गुंतवणुकीच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि बँकिंग फ्रॉड सर्रास होत आहेत. अशा परिस्थितीत, हे नवीन वॉर्निंग फीचर युझर्सना अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल, असं टेक्नोलॉजी तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
याशिवाय, मेटा कंपनी व्हॉट्सॲपसाठी आणखी काही नवीन फीचर्सवर काम करत आहे. यामध्ये होम स्क्रीनवर थेट वापरता येणारं व्हॉईस नोट विजेट आणि आयफोन युझर्ससाठी 'व्ह्यू वन्स' टेक्स्ट मेसेजसारख्या सुविधांचा समावेश आहे. युझर्सचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी कंपनी हे अपडेट्स आणत आहे.


