USA 5 Lakhs Monthly Earning : अमेरिकेत गेलं की भरघोस कमाई करता येते, असं आपल्याकडे अनेकांना वाटतं. पण तिथे महिन्याला ५ लाख रुपये कमावूनही, खर्च वजा झाल्यानंतर हातात अतिशय कमी पैसे शिल्लक राहतात.
नवी दिल्ली : भारतातील अनेक तरुण भारताबाहेर विदेशात नोकरी करतात. अमेरिका, कॅनडा, दुबई यासारख्या विदेशात नोकरी करणाऱ्या तरुणांना त्याचा चांगला पगारही मिळतो. पण महिन्याला लाखोंच्या घरात पगार मिळूनही त्यांच्या हातात तुलनेने अतिशय कमी पैसे शिल्लक राहतात. अनेक तरुण अमेरिकेत नोकरीचं स्वप्न पाहतात, पण वास्तवात त्यांना मोठी कमाई करुनही हातात कमीच पैसे शिल्लक राहत असल्याचं दिसतं.
तरुणांचं 'अमेरिकन ड्रीम'
भारतातून अनेक तरुण अमेरिकेत स्थायिक होण्याचं स्वप्न पाहतात. महिन्याला $6,000 म्हणजे सुमारे ५ लाख रुपये कमावले की आयुष्य सेट झालं असं वाटतं. पण जेव्हा डॉलरमध्ये कमावून डॉलरमध्येच खर्च केले जातात, तेव्हा खरं चित्र समोर येतं.
पगारातून पहिली कपात - टॅक्स
अमेरिकेत पगार जमा होताच सर्वात आधी त्यावर टॅक्स कापला जातो. फेडरल, स्टेट आणि सोशल सिक्युरिटी मिळून पगाराच्या जवळपास २० ते २५ टक्के रक्कम टॅक्समध्ये जाते. म्हणजे, $6,000 पगारात तुमच्या हातात फक्त $4,500 ते $4,800 येतात.
सर्वात मोठा खर्च - घरभाडं
पगाराचा मोठा हिस्सा घरभाड्यातच जातो. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्कसारख्या शहरांमध्ये 1BHK घरासाठी महिन्याला $1,800 ते $2,500 भाडं मोजावं लागतं. वीज, गॅस आणि वाय-फाय बिलासाठी दर महिन्याला $300 वेगळे लागतात.
खाद्यपदार्थ आणि किराणा खर्च
बाहेर जेवणासाठी खर्च खूप वाढतो. घरी स्वयंपाक केला तरी भारतीय किराणा सामानाचे दर जास्त आहेत. भाज्या, तांदूळ सगळंच महाग आहे. घरी जेवण बनवून खाल्लं तरी महिन्याला $500 म्हणजेच भारतीय रुपयानुसार, सुमारे ४२,००० रुपये सहज खर्च होतात.
कारचा हप्ता, इन्शुरन्स -
अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये कार ही एक अत्यावश्यक गरज आहे. कारचा EMI, पेट्रोल आणि इन्शुरन्स मिळून महिन्याला $700 पर्यंत खर्च येतो. वैद्यकीय खर्च प्रचंड असल्याने हेल्थ इन्शुरन्स काढणं बंधनकारक आहे. याशिवाय फोन बिल, शॉपिंग असे इतर खर्चही आहेतच.
शेवटी हातात किती पैसे उरतात?
एवढे सगळे खर्च भागवून, एकट्या राहणाऱ्या व्यक्तीने महिन्याला $500 ते $1,000 म्हणजेच ४०,००० ते ८०,००० रुपये वाचवले तरी ती मोठी गोष्ट समजली जाते. एखादा कुटुंबासोबत राहत असेल किंवा महागड्या शहरात असाल, तर बचत करणं आणखी कठीण होतं. पगार जास्त असला तरी जगण्याचा खर्चही जास्त आहे, हेच अमेरिकेचं वास्तव आहे.

