महिंद्रा लवकरच आपली लोकप्रिय एसयूव्ही XUV 3XO चं नवीन सीएनजी मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ही महिंद्राची पहिली फॅक्टरी-फिटेड सीएनजी कार असेल. यामुळे टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझाला तगडी टक्कर मिळेल.

महिंद्रा सध्या भारतीय वाहन बाजारात आपल्या एसयूव्ही गाड्यांमध्ये सतत नवीन अपडेट्स देत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक मॉडेल्स अपडेट केल्यानंतर, आता कंपनी आपली लोकप्रिय एसयूव्ही XUV 3XO मध्येही मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी XUV 3XO चं नवीन मॉडेल लाँच होऊ शकतं. मात्र, महिंद्राने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. बाजारात अशी चर्चा आहे की हे नवीन मॉडेल XUV 3XO चं सीएनजी व्हर्जन असेल. तसं झाल्यास, फॅक्टरी-फिटेड सीएनजी किटसह येणारी ही महिंद्राची पहिलीच कार ठरेल.

महिंद्राची पहिली फॅक्टरी-फिटेड सीएनजी कार?

महिंद्राने २०२४ मध्ये XUV 3XO बाजारात लाँच केली होती. सुरुवातीपासूनच या गाडीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनीने याचे अनेक व्हेरियंट्सही आणले. आता जर XUV 3XO चं सीएनजी मॉडेल आलं, तर महिंद्राच्या ताफ्यातील हा एक नवा अध्याय असेल. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी गाड्यांची मागणी वेगाने वाढत आहे. सीएनजी मॉडेलमुळे महिंद्राला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल आणि भविष्यातील कडक प्रदूषण नियम पाळणंही सोपं जाईल.

इंजिन कोणतं असेल?

सध्या XUV 3XO मध्ये १.२ लिटर, ३-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिनसह अनेक पॉवरट्रेन ऑप्शन्स मिळतात. यात १.२ लिटर एमस्टॅलियन टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर टर्बो डिझेल इंजिनचाही पर्याय आहे. रिपोर्ट्सनुसार, सीएनजी मॉडेलसाठी १.२ लिटर टर्बोचार्ज्ड MPFI इंजिन वापरलं जाऊ शकतं. पेट्रोल व्हर्जनमध्ये हे इंजिन १११ PS पॉवर आणि २०० Nm टॉर्क जनरेट करतं. पण सीएनजीवर चालवताना पॉवर आणि टॉर्क थोडा कमी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हे सीएनजी मॉडेल मॅन्युअल गिअरबॉक्ससोबतच मिळण्याची चिन्हं आहेत. पण सीएनजी ऑटोमॅटिक गाड्यांची वाढती मागणी पाहता, महिंद्रा यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही देऊ शकते. अर्थात, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बूट स्पेस कमी होणार का?

गाडीत सीएनजी सिस्टीम बसवण्यासाठी XUV 3XO मध्ये काही तांत्रिक बदल करावे लागतील. कंपनी सस्पेन्शन आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीममध्ये आवश्यक ते बदल करू शकते. सीएनजी टँक गाडीच्या बूट स्पेसमध्ये (डिक्कीत) बसवला जाईल. आता टाटा आणि ह्युंदाईसारखं ड्युअल-सिलिंडर तंत्रज्ञान महिंद्रा वापरणार की एकच मोठा टँक देणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. टँकचा आकार आणि रचनेनुसार गाडीच्या बूट स्पेसवर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

किंमत किती असेल?

सध्या XUV 3XO ची एक्स-शोरूम किंमत ७.७९ लाख रुपयांपासून ते १५.०४ लाख रुपयांपर्यंत आहे. जर सीएनजी मॉडेल आलं, तर त्याची किंमत पेट्रोल मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते. पण नवीन मॉडेलच्या किमतीबाबत महिंद्राने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

XUV 3XO ची थेट स्पर्धा टाटा नेक्सॉन, मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेट यांसारख्या गाड्यांशी आहे. नेक्सॉन आणि ब्रेझा आधीपासूनच फॅक्टरी-फिटेड सीएनजी पर्यायामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे जर XUV 3XO चं सीएनजी मॉडेल आलं, तर या सेगमेंटमध्ये महिंद्राचं पारडं आणखी जड होईल. १५ ऑक्टोबरला नवीन मॉडेल लाँच होण्याच्या बातम्यांवर महिंद्राने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे लाँचची तारीख आणि सीएनजी मॉडेलचे तांत्रिक तपशील अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होतील.