कॅनडाच्या ६१ वर्षीय डोनाजीन वाइल्ड यांनी हंट्समन वर्ल्ड सीनियर गेम्समध्ये सलग पाच तास प्लँक करत नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. मार्च २०२४ मध्ये त्यांनीच केलेला साडेचार तासांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आता त्यांनी स्वतःच मोडला आहे.
वय हा फक्त एक आकडा असतो, हे कॅनडाच्या ६१ वर्षीय डोनाजीन वाइल्ड यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. हंट्समन वर्ल्ड सीनियर गेम्समध्ये त्यांनी सलग पाच तास 'अॅबडॉमिनल प्लँक' (पोटावर जोर देऊन शरीर तोलणे) करत नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. महिलांच्या कॅटेगरीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड ठरला आहे. त्यांच्या या भन्नाट कामगिरीनंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला, तर सोशल मीडियावरही लोक थक्क झाले आहेत.
हंट्समन वर्ल्ड सीनियर गेम्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या या रेकॉर्डचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. घड्याळाचे काटे पुढे सरकत असतानाही डोनाजीन अत्यंत कठीण अशा प्लँक पोझिशनमध्ये तासनतास तशाच राहिल्याचं या व्हिडिओत दिसतं. जेव्हा त्यांनी पाच तासांचा टप्पा पार केला, तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये एकच शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. हे अत्यंत कठीण चॅलेंज पूर्ण केल्यानंतर डोनाजीन यांच्या चेहऱ्यावरही एक मोठा आणि विजयी आनंद पाहायला मिळाला.
हा व्हायरल व्हिडिओ इथे पाहा:
डोनाजीन यांचं हे यश आणखी खास आहे कारण त्यांनी स्वतःचाच जुना रेकॉर्ड मोडला आहे. याआधी २१ मार्च २०२४ रोजी कॅनडामधील अल्बर्टा प्रांतातल्या मॅग्राथ शहरात त्यांनी ४ तास, ३० मिनिटे आणि ११ सेकंद प्लँक करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. आता पाच तास प्लँक करून त्यांनी स्वतःचंच हे टार्गेट आणखी पुढे नेलं आहे.
सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. एका युझरने कमेंट करत म्हटलंय की, 'दोन मिनिटं प्लँक करणंही मला शक्य नाही', तर अनेकांनी त्यांच्या ताकदीचं आणि स्टॅमिनाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. दुसऱ्या एका युझरने लिहिलंय की, 'पाच तास त्यांना असं पाहणं खूप वेदनादायी वाटत होतं, पण शेवटी त्यांचा विजय भारी होता.'
हा रेकॉर्ड म्हणजे एका रात्रीत मिळालेलं यश नाही, तर यामागे त्यांच्या अनेक वर्षांच्या फिटनेस ट्रेनिंगची मेहनत आहे. डोनाजीन त्यांच्या रोजच्या वर्कआउटमध्ये पुश-अप्स, वेट लिफ्टिंग, रनिंग आणि डेड हँग्स यांसारख्या गोष्टी आवर्जून करतात. याआधीही त्यांनी फिटनेसच्या अनेक चॅलेंजेसमध्ये रेकॉर्ड्स बनवले आहेत. २०२४ मध्येच त्यांनी ६० मिनिटांत तब्बल १,५७५ पुश-अप्स मारण्याचा विक्रमही केला होता.
वर्ल्ड सीनियर गेम्समधली त्यांची ही कामगिरी केवळ एक फिटनेस रेकॉर्ड राहिलेली नाही. जिद्द, शिस्त आणि स्टॅमिना यांचं ते एक उत्तम उदाहरण बनलं आहे. वय वाढलं तरी माणसाची ताकद आणि इच्छाशक्ती कमी होत नाही, हेच त्यांनी जगाला दाखवून दिलं आहे.
