लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात आलेला नाही. जुलै महिना उजाडला तरी १५०० रुपयांचा हप्ता आला नसल्याने चर्चा आहे. मात्र याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात अतिशय लोकप्रिय योजना ठरली. ही योजना सुरू होऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांना १५०० रुपयांची मदत केली जाते. आता मे महिन्यापर्यंत रक्कम दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र आता जून महिना उलटून जुलै महिना सुरू झाला तरी जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे हा जूनचा हप्ता कधी येणार याची अनेक महिलांमध्ये प्रतिक्षा आहे. अनेक महिलांकडून याबाबत विचारणाही होत आहे. अशात मागील जूनच्या आणि आताच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कधी मिळणार योजनेचा हप्ता?

मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन महिने म्हणजेच मार्च आणि एप्रिलमध्ये पात्र महिलांना या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकदाच एप्रिल महिन्यात खात्यात पाठवण्यात आला होता. त्यामुळे महिलांना एकत्र ३००० रुपये आले होते. आता जन महिन्याचा हप्ता अद्याप आलेला नाही. त्यामुळे या जुलै महिन्यात जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचा हप्ता खात्यात येणार असल्याची माहिती आहे. याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र १२ ते १५ जुलैपर्यंत दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रच असे ३००० रुपये खात्यात येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आतापर्यंत १ कोटी ६६ लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत. तर ७० हजार कोटीहून अधिकचा निधी या योजनेसाठी खर्च झाला आहे. तसंच योजना दोन वर्षांपूर्वी सुरू झाली त्यावेळी पात्र नसलेल्या महिलांनीही यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यानंतर ई-केव्हायसी, तसंच इतर निकषात न बसलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं होतं. तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरल्याने या योजनेतून त्यांचा हप्ता थांबवण्यात आला होता.