Jio Platforms IPO : जिओच्या आयपीओची प्राईस बँड ठरली, एका शेअरची किंमत किती?
जिओ प्लॅटफॉर्म्सने आपल्या आयपीओची प्राईस बँड १०६५ ते १११९ रुपये निश्चित केली आहे. कंपनीने भागधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी खास डिस्काउंटही जाहीर केलाय. हा आयपीओ २१ ऑक्टोबरला खुला होणार असून, जाणून घ्या सर्व महत्त्वाचे डिटेल्स.

जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओची प्राईस बँड फायनल
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडने त्यांच्या बहुप्रतिक्षित आयपीओची प्राईस बँड अधिकृतपणे जाहीर केली आहे. कंपनीने एका इक्विटी शेअरची किंमत १०६५ ते १११९ रुपये निश्चित केलीय. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने बुधवारी स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती दिली.
रिलायन्स इंडस्ट्रीज या आयपीओच्या माध्यमातून आपली डिजिटल आणि टेलिकॉम उपकंपनी शेअर बाजारात लिस्ट करणार आहे. मार्केटला जिओ प्लॅटफॉर्म्सच्या या आयपीओकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

आयपीओच्या तारखा आणि अँकर गुंतवणूकदारांचे शेड्युल
रेग्युलेटरी फायलिंगनुसार, हा आयपीओ २१ ऑक्टोबरला सर्वसामान्यांसाठी खुला होईल. गुंतवणूकदार २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत यासाठी बोली लावू शकतात.
अँकर गुंतवणूकदार १९ ऑक्टोबरला या प्रक्रियेत सहभागी होतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनी शेअर अलॉटमेंट आणि लिस्टिंगचे डिटेल्स जाहीर करेल.
जिओची प्राईस बँड, लॉट साईझ आणि फ्रेश इश्यूचे डिटेल्स
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संचालक मंडळाच्या आयपीओ समितीने या प्राईस बँडला मंजुरी दिली आहे. शेअरची फ्लोअर प्राईस १०६५ रुपये, तर कॅप प्राईस १११९ रुपये आहे.
कंपनी १० रुपये दर्शनी मूल्याचे तब्बल २७ कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. याची किमान लॉट साईझ १२ शेअर्सची आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १२ किंवा त्याच्या पटीत शेअर्ससाठी बोली लावावी लागेल.
रिलायन्सचे भागधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी खास कोटा
रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले भागधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी खास राखीव कोटा ठेवला आहे. कंपनीने पात्र भागधारकांसाठी २५०० कोटी रुपयांचे शेअर्स राखून ठेवलेत. १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत रिलायन्सचे शेअर्स असलेले वैयक्तिक गुंतवणूकदार आणि हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) या कोट्यासाठी पात्र ठरतील.
तसेच, कंपनीने पात्र कर्मचाऱ्यांसाठी ५०० कोटी रुपयांचे शेअर्स राखीव ठेवले आहेत. या कोट्यातून अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ५४ रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
रेग्युलेटरी मंजुरी आणि पब्लिक लिस्टिंग
जिओ प्लॅटफॉर्म्सने १४ ऑक्टोबरला गुजरातच्या अहमदाबादमधील रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे आपला रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) दाखल केला.
कंपनीने यापूर्वी १९ जून रोजी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला होता. रिलायन्सने २८ ऑगस्ट रोजी मार्केट रेग्युलेटर सेबीकडून (SEBI) निरीक्षण पत्र मिळाल्याची पुष्टी केली होती. या फायलिंगमध्ये एकूण इश्यू साईझ आणि शेअर लिस्टिंगची अंतिम तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.







