जपानमध्ये हल्लेखोराने कर्मचाऱ्यांवर चाकूने सपासप वार केले आणि एक द्रव देखील फवारला. अचानक झालेल्या या हल्ल्यात 14 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक अग्निशमन दलाचे अधिकारी तोमोहारू सुगियामा यांनी दिली.
टोकियो: जगात सर्वात कमी गुन्हेगारीचे प्रमाण जपानमध्ये आहे. याच देशात अज्ञात हल्लेखोराने अचानक चाकू हल्ला केला.तसेच लिक्वीड अंगावर फेकल्याने खळबळ उडाली आहे. मिशिमा शहरातील योकोहामा रबर कंपनीच्या फॅक्टरीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. हल्लेखोराने कर्मचाऱ्यांवर चाकूने वार केले आणि एक अज्ञात द्रव देखील फवारला. या हल्ल्यात 14 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक अग्निशमन दलाचे अधिकारी तोमोहारू सुगियामा यांनी दिली. पाच ते सहा जणांना चाकूने भोसकण्यात आले असून, इतरांना द्रव फवारल्यामुळे त्रास झाला, असे त्यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वजण शुद्धीवर असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जखमींची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी हल्लेखोराला पकडले
पोलिसांनी घटनास्थळावरूनच हल्लेखोराला पकडले. हत्येचा प्रयत्न यासह इतर गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा हल्ला ट्रक आणि बसचे टायर बनवणाऱ्या एका मोठ्या कंपनीत झाला. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करत आहेत. जपानमध्ये बंदुकीने होणारे हल्ले दुर्मिळ असले तरी, अलीकडच्या काळात चाकू हल्ल्याच्या घटना वाढल्याने सार्वजनिक सुरक्षेवर चर्चा सुरू झाली आहे.
जगात सर्वात कमी गुन्हेगारी दर असलेल्या देशांपैकी एक असलेल्या जपानसाठी ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. 2022 मध्ये माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या आणि त्यानंतरच्या काही हल्ल्यांमुळे देशाच्या सुरक्षा धोरणांवर टीका झाली होती. मात्र, सर्वसाधारणपणे जपानमध्ये असे हल्ले होत नाहीत. त्यामुळे आजच्या हल्ल्याची मोठी चर्चा होत आहे. हल्लेखोराने वापरलेला अज्ञात द्रव कोणता होता, यासह इतर गोष्टी तपासल्या जात आहेत. अशा द्रवाने हल्ला करण्यामागे काय कारण असावे, याचा खुलासा सविस्तर तपासात होईल अशी अपेक्षा आहे.

