शारीरिक संबंधामुळे जोडीदारांमधील बंध अधिक घट्ट होतो. जर तुम्हाला पूर्वीसारखी लैंगिक संबंधात आवड राहिली नसेल किंवा इतर समस्या जाणवत असतील, तर यामागे व्हिटॅमिनच्या कमतरतेचे कारण असू शकते. कोणत्या व्हिटॅमिनमुळे सेक्सलाईफ सुधारू शकते ते पाहूया… 

लैंगिक जीवन आनंदी असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण काही वेळा लैंगिक क्रियेत रस कमी होतो किंवा शक्तीची कमतरता जाणवते. याची अनेक कारणे आहेत. त्यात काही जीवनसत्त्वेही महत्त्वाची भूमिका बजावतात. तज्ज्ञांच्या मते, शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता, विशेषतः व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास लैंगिक जीवनात समस्या निर्माण होतात.

व्हिटॅमिन डी (Vitamin D) ला 'सनशाईन व्हिटॅमिन' म्हटले जाते. लैंगिक आरोग्यावर याचा खोलवर परिणाम होतो. म्हणूनच याला 'सेक्स व्हिटॅमिन' (Sexual Vitamin) असेही म्हटले जाते. जर तुम्हाला लैंगिक संबंध ठेवण्यात अडचण येत असेल, तर आधी तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी तपासा (Test). एका अभ्यासातही (Study) व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शारीरिक संबंधांवर परिणाम होतो, असे म्हटले आहे. आज आम्ही तुम्हाला या अभ्यासात काय म्हटले आहे ते सांगणार आहोत.

युरोपियन जर्नल ऑफ एंडोक्राइनोलॉजीमध्ये या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अभ्यासानुसार, शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे पुरुष आणि महिला दोघांच्याही लैंगिक कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्यावर लोकांची लैंगिक इच्छा कमी होते.

पुरुषांच्या सेक्स लाईफवर व्हिटॅमिन डीचा परिणाम : क्लीव्हलँड हार्ट लॅबनुसार, व्हिटॅमिन डी जननेंद्रियांना रक्तपुरवठा वाढविण्यात मदत करते. हे रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरांना सुधारून रक्तप्रवाहाला आधार देते. पुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळल्यास, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. सर्वांना माहीत आहे की, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यावर इरेक्टाइल डिसफंक्शन आणि वंध्यत्वाची समस्या उद्भवते. याशिवाय पुरुषांची लैंगिक क्रियेतील आवड कमी होते. त्यांना अनेक लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागते.

महिलांच्या सेक्स लाईफवर व्हिटॅमिन डीचा काय परिणाम होतो? : महिलांवरही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा खोलवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये इस्ट्रोजेनची कमतरता निर्माण होते. यामुळे महिलांची लैंगिक इच्छा कमी होते. व्हिटॅमिन डी कमी असलेल्या महिलांमध्ये योनीमार्गात कोरडेपणा येतो. अशावेळी लैंगिक संबंध ठेवल्यास वेदना होतात. त्यांच्यात नैराश्याची लक्षणेही दिसून येतात. एका अभ्यासात व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या १४ महिला आणि १४ निरोगी महिलांची तपासणी करण्यात आली. अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, सामान्य व्हिटॅमिन डी पातळी असलेल्या महिलांच्या तुलनेत, व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या महिलांमध्ये लैंगिक इच्छा, परमोच्च आनंद आणि समाधानात घट दिसून आली.
मासिक पाळी थांबलेल्या आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या महिलांना मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका असतो. त्यांच्या पोटावरील वाढलेली चरबी त्यांच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करते.

उपाय काय? : लैंगिक जीवनात समस्या जाणवल्यास व्हिटॅमिन डीची तपासणी करून घ्यावी. त्याची पातळी कमी असल्यास डॉक्टर गोळ्या देतात. तसेच, सूर्यप्रकाशात बसण्याचा सल्ला देतात. व्हिटॅमिन डी जास्त असलेले पदार्थ खाणे देखील आवश्यक आहे.