FASTag Annual Pass : केवळ 3000 रुपयांत वर्षभर टोल फ्री प्रवास! मग वाट कशाची बघाताय?
मुंबई : वारंवार प्रवास करणाऱ्या खाजगी वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने एक उत्तम योजना जाहीर केली आहे. आजपासून FASTag वार्षिक पास देशभरात उपलब्ध झाला आहे. कसा मिळवायचा? फायदे, मर्यादा तुमच्यासाठी..

३००० मध्ये वर्षभर टोल फ्री प्रवास
देशभरात रस्त्यांवरील प्रवास अधिक सोपा व्हावा यासाठी केंद्र सरकारने आजपासून (१५ ऑगस्ट) FASTag वार्षिक पास सुरू केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सुरू केलेल्या या पासमुळे, एकदाच ३,००० रुपये भरून महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर एक वर्ष किंवा जास्तीत जास्त २०० फेऱ्यांपर्यंत टोल न देता प्रवास करता येईल. हा वार्षिक पास फक्त खाजगी कार, जीप, व्हॅन यांसारख्या बिगर-व्यावसायिक वाहनांसाठीच लागू आहे. आता प्रश्न असा हा पास कसा घ्यायचा आणि अर्ज कसा करायचा? चला, जाणून घेऊया.
FASTag वार्षिक पास म्हणजे काय?
FASTag वार्षिक पास ही एक खास सेवा आहे. ती सक्रिय केल्यानंतर निवडलेल्या राष्ट्रीय महामार्ग (NH) किंवा राष्ट्रीय एक्सप्रेसवे (NE) वर तुम्ही एक वर्ष किंवा जास्तीत जास्त २०० फेऱ्यांपर्यंत (जे आधी पूर्ण होईल ते) प्रवास करू शकता. या पासमुळे प्रत्येक वेळी टोल भरण्याची गरज नाही. हा पास फक्त खाजगी कार, जीप आणि व्हॅनसारख्या वाहनांसाठीच लागू आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मते, नेहमीच्या टोलपेक्षा ३,००० रुपयांचा वार्षिक पास घेतल्यास सुमारे ७०% बचत होऊ शकते. वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी, विशेषतः महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर नेहमी जाणाऱ्यांसाठी, हा पास मोठ्या प्रमाणात खर्च वाचवण्याची संधी देतो.
ऑनलाइन FASTag वार्षिक पास कसा ऍक्टिव्हेट करायचा?
- Android किंवा iOS साठी राजमार्गयात्रा मोबाईल अॅप डाउनलोड करा किंवा NHAI वेबसाइटला भेट द्या.
- तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून लॉगिन करा. वाहन, FASTag तपशील योग्यरित्या नोंदवा.
- FASTag योग्यरित्या बसवला आहे का, लिंक झाला आहे का, सक्रिय आहे का ते तपासा.
- त्यानंतर उपलब्ध ऑनलाइन पेमेंटद्वारे ३००० रुपये शुल्क भरा.
- पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुमचा वार्षिक पास FASTag शी लिंक केला जाईल.
FASTag वार्षिक पासची वैधता:
- वार्षिक पास सक्रिय झाल्यापासून तो एक वर्ष किंवा २०० ट्रिप (जे आधी पूर्ण होईल ते) पर्यंत वैध राहतो.
- २०० ट्रिप पूर्ण झाल्यावर किंवा एक वर्ष संपल्यानंतर, हा पास आपोआप सामान्य FASTag मध्ये बदलतो.
- फायदे सुरू ठेवायचे असल्यास, वापरकर्त्याने पुढील २०० ट्रिप / १ वर्षासाठी पुन्हा पास सक्रिय करावा लागतो.
- म्हणजेच, वार्षिक पासचा वापर ही ट्रिप मर्यादा किंवा कालावधी यानुसार नियंत्रित केला जातो.
FASTag वार्षिक पासच्या मर्यादा:
- हा पास फक्त निवडक राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय एक्सप्रेसवे (NE) वरील टोल प्लाझासाठीच लागू आहे.
- परिमिती प्लाझा: राज्य महामार्ग, शहर टोल, स्थानिक संस्था चालवत असलेले टोल प्लाझा, पार्किंग सुविधा इत्यादी ठिकाणी सामान्य FASTag प्रमाणेच शुल्क आकारले जाईल.
- वाहन मर्यादा: हा FASTag पास ज्या वाहनावर लावलेला आहे आणि ज्या वाहनाच्या नावावर नोंदणीकृत आहे, फक्त त्या वाहनासाठीच वैध आहे. तो दुसऱ्या वाहनात वापरता येणार नाही.
- या नियमांमुळे पासचा वापर काटेकोरपणे नियंत्रित केला जातो आणि तो फक्त वापरकर्त्याच्या स्वतःच्या वाहनापुरताच मर्यादित राहतो.
