- Home
- Utility News
- Bengaluru Mumbai Train : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बेंगळुरू प्रवासाचा कंटाळा संपणार; १८ तासांत पोहोचवणारी 'ही' गाडी येणार?
Bengaluru Mumbai Train : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बेंगळुरू प्रवासाचा कंटाळा संपणार; १८ तासांत पोहोचवणारी 'ही' गाडी येणार?
Bengaluru Mumbai Train : भारतीय रेल्वे बेंगळुरू आणि मुंबई दरम्यान दुरांतो एक्सप्रेस सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. या नवीन सेवेमुळे सध्याचा 24 तासांचा प्रवास 18 तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

बेंगळुरू ते मुंबई अवघ्या 18 तासांत?
मुंबई : बेंगळुरू आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्या जवळपास 24 तास लागणारा रेल्वे प्रवास लवकरच 18 तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. तब्बल 1209 किलोमीटरचे अंतर अधिक वेगाने पार करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून नव्या दुरांतो एक्सप्रेसचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
वेगवान प्रवासासाठी दुरांतो एक्सप्रेसचा प्रस्ताव
रेल्वे बोर्डाकडून आठवड्यातून दोनदा सुपरफास्ट एक्सप्रेस चालवण्यास परवानगी मिळाल्यानंतर, मुंबई–बेंगळुरू मार्गावर दुरांतो एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सध्या या मार्गावरील काही एक्सप्रेस गाड्या उद्यान एक्सप्रेसपेक्षाही संथ धावत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नव्या एक्सप्रेसची माहिती
याआधीच 16553/16554 बेंगळुरू – लोकमान्य टिळक टर्मिनस – बेंगळुरू एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. ही गाडी 9 डिसेंबर 2025 पासून सेवेत दाखल झाली आहे.
16553 : शनिवार व मंगळवारी रात्री 8:35 वाजता बेंगळुरूहून सुटून दुसऱ्या दिवशी 8:40 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचते
16554 : रविवार व बुधवारी रात्री 11:15 वाजता एलटीटीहून सुटून दुसऱ्या दिवशी 10:30 वाजता बेंगळुरूला पोहोचते
या एक्सप्रेसला हुबळी आणि पुणेसह एकूण 14 प्रमुख थांबे असून, ती 17 एलएचबी कोचसह धावते. गाडीची देखभाल बेंगळुरूमध्ये केली जाणार आहे.
केएसआर बेंगळुरू, सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस?
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्ड केएसआर बेंगळुरू ते सीएसएमटी मुंबई दरम्यान दुरांतो एक्सप्रेस सुरू करण्याच्या विचारात आहे. ही गाडी तुमकुरू, दावणगेरे, हुबळी, बेलागवी, मिरज आणि पुणे मार्गे धावणार आहे.
अंदाजे वेळापत्रकानुसार
बेंगळुरूहून दुपारी 4:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता मुंबई
मुंबईहून दुपारी 3:00 वाजता सुटून सकाळी 9:30 वाजता बेंगळुरू
ही सेवा प्रामुख्याने टू-टायर एसी (2A) प्रकारात असणार असून, देखभाल बेंगळुरूमध्येच केली जाणार आहे.
दुरांतो एक्सप्रेस का खास?
दुरांतो एक्सप्रेस ही मर्यादित थांबे, अधिक वेग आणि प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याच्या सुविधांसाठी ओळखली जाते. तिकीट दर तुलनेने जास्त असले तरी आरामदायी आणि वेळ वाचवणारा पर्याय मानला जातो. अंदाजानुसार, बेंगळुरू–मुंबई प्रवासासाठी 3AC तिकीट सुमारे 2,500 रुपये असू शकते.
अधिकृत घोषणा अद्याप नाही
दुरांतो एक्सप्रेसबाबत चर्चा सुरू असली तरी, बेंगळुरूचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष कुमार सिंग यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, आठवड्यातून दोनदा धावणारी सुपरफास्ट सेवा रद्द करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवासी संघटनांची भूमिका
झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचे माजी सदस्य प्रकाश मंडोथ यांनी बेंगळुरू–मुंबई मार्गावर 18 तासांपेक्षा कमी वेळ घेणारी ट्रेन ही फार दिवसांची गरज असल्याचे सांगितले. तर, कर्नाटक रेल्वे वेदिकेचे सदस्य के. एन. कृष्णा प्रसाद यांनी या दोन महानगरांदरम्यान वेगवान आणि परवडणारी रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे नमूद केले.

