२०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीने मारलेल्या त्या ऐतिहासिक सिक्सचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतोय. पाकिस्तानी फॅन्स 'दिल दिल पाकिस्तान' गात असताना कोहलीने सिक्स मारला आणि स्टेडियममध्ये 'चक दे इंडिया'चा नारा घुमला, तोच हा रोमांचक क्षण.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या हाय-व्होल्टेज मॅचचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होतोय. हा व्हिडीओ भारतीय क्रिकेट फॅन्सना पुन्हा पुन्हा पाहायला नक्कीच आवडेल.

कोणता आहे हा व्हिडीओ?

तुम्हाला २०२२ चा टी-२० वर्ल्ड कप आठवत असेलच. या स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानवर मिळवलेला तो थरारक विजय भारतीय फॅन्सच्या कायम लक्षात राहील. याच ऐतिहासिक मॅचचा एक जुना व्हिडीओ आता पुन्हा चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे? एका सार्वजनिक ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर भारत-पाकिस्तान मॅच सुरू आहे. मॅच अतिशय अटीतटीच्या वळणावर पोहोचली आहे. पाकिस्तान जिंकणार असं वाटत असताना त्यांचे फॅन्स मोठ्या उत्साहात 'दिल दिल पाकिस्तान' गात जल्लोष करत आहेत.

पण क्रीजवर विराट कोहली उभा होता. त्याने पाकिस्तानचा फास्ट बॉलर हरिस रौफच्या बॉलवर एक जबरदस्त सिक्स मारला. कोहलीच्या या एका सिक्सने संपूर्ण स्टेडियम आणि तिथलं वातावरणच बदलून टाकलं. सिक्स जाताच पाकिस्तानी फॅन्स एकदम शांत झाले. तर दुसरीकडे, टीम इंडियाच्या फॅन्सनी जागेवरून उड्या मारत 'चक दे इंडिया'च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, पाकिस्तानी फॅन्स 'दिल दिल पाकिस्तान' गात असतानाच कोहली सिक्स मारतो आणि ते सगळे गप्प बसतात. त्यानंतर भारतीय फॅन्स 'चक दे इंडिया'चा नारा देतात आणि बॅकग्राउंडला तेच गाणं वाजू लागतं.

कशी होती ती मॅच?

ही मॅच २३ ऑक्टोबर २०२२ रोजी झाली होती. म्हणजेच आजच्याच दिवशी. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये हा सामना खेळवला गेला. पराभवाच्या छायेत असलेल्या टीम इंडियाला विराट कोहलीने एकट्याच्या जीवावर विजय मिळवून दिला होता. पाकिस्तानने २० ओव्हरमध्ये १५९/८ असा स्कोअर उभा केला होता. शान मसूदने ४२ बॉलमध्ये नाबाद ५२ रन केले, तर इफ्तिखार अहमदने ३४ बॉलमध्ये ५१ रन फटकावले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत कमाल केली होती.

१६० रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या ३१ रन्सवर ४ विकेट्स गेल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली होती. अशा वेळी कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी खंबीरपणे उभे राहत ११३ रन्सची पार्टनरशिप केली. हार्दिक पंड्या ३७ बॉलमध्ये ४० रन करून शेवटच्या ओव्हरमध्ये आऊट झाला.

टीम इंडियावर प्रचंड प्रेशर होतं. १९ व्या ओव्हरमध्ये रौफच्या बॉलिंगवर कोहलीने दोन अत्यंत महत्त्वाचे सिक्स मारले. याच सिक्सने टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी १६ रन्सची गरज होती. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाज बॉलिंग करत होता. या ओव्हरमध्ये नो-बॉल, एक सिक्स, एक वाईड आणि फ्री हिट असा सगळा ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर रविचंद्रन अश्विनने विनिंग रन काढला. या मॅचमध्ये कोहलीने ५३ बॉलमध्ये सहा फोर आणि चार सिक्सच्या मदतीने नाबाद ८२ रन केले. भारताने १६० रन्सचं टार्गेट चार विकेट्स राखून पूर्ण केलं. आज २३ ऑक्टोबर आहे, त्यामुळेच त्या ऐतिहासिक दिवसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा ट्रेंड करतोय.

Scroll to load tweet…