टीम इंडियाला क्राइस्टचर्चमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्याआधी मोठा धक्का बसलाय. इशान किशन मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्याने संघातून बाहेर पडलाय. त्याच्या जागी आता एका नव्या खेळाडूची एन्ट्री होणार आहे. हा नवा शिलेदार कोण आहे, याची संपूर्ण माहिती इथे वाचा.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना उद्या दुपारी १२:३० वाजता क्राइस्टचर्च मैदानावर खेळवला जाईल. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत दमदार सुरुवात केलीय. पण या दुसऱ्या सामन्याआधीच संघाला मोठा धक्का बसलाय. स्टार खेळाडू इशान किशन दुखापतीमुळे दुसऱ्या टी-२० मधून बाहेर पडलाय. त्यामुळे आता त्याच्या जागी नव्या खेळाडूला संधी देणं भाग आहे. अशात वैभव सूर्यवंशीचं काय होणार? आणि संघात आलेला नवा खेळाडू कोण आहे? याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

मांडीच्या स्नायूला दुखापत!

इशान किशनच्या उजव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झालीय, त्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. इशान बाहेर गेल्यामुळे युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू असला तरी, इशानची जागा भरून काढण्यासाठी वैभव हाच योग्य पर्याय मानला जातोय.

इशानच्या जागी कुमार कुशाग्रची एन्ट्री!

इशान किशन उपलब्ध नसल्याने बीसीसीआयने झारखंडच्या २१ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्रला संघात सामील केलंय. सध्या संजू सॅमसन हा संघाचा मुख्य यष्टीरक्षक आहे. पण ऐनवेळी गरज पडल्यास बॅकअप असावा, म्हणून कुशाग्रला राखीव यष्टीरक्षक म्हणून बोलावण्यात आलंय. कुशाग्र हा राखीव कीपर असल्याने, वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळायला कोणतीही अडचण येणार नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कुमार कुशाग्रची हवा!

कुमार कुशाग्र हा टॉप-४ मध्ये फलंदाजी करतो. त्याने नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये १०१ धावांची शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर भारत 'अ' कडून खेळताना ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध पहिल्या डावात ११३ आणि दुसऱ्या डावात नाबाद ४६ धावा कुटल्या होत्या. कुशाग्रने ३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २५०७ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २०२२ च्या रणजी ट्रॉफीमध्ये नागालँडविरुद्ध त्याने अवघ्या १७ वर्षे १४४ दिवस वयात २६६ धावांची खेळी केली होती. यासोबतच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २५०+ धावा करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.