मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२७ साठी कायरन पोलार्डची मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) म्हणून नियुक्ती केली आहे. तो महेला जयवर्धनेची जागा घेणार आहे. पोलार्डच्या अनुभवाचा संघाला मोठा फायदा होईल, असा विश्वास फ्रँचायझीने व्यक्त केला आहे.

मुंबई : आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू कायरन पोलार्ड आता संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) असणार आहे. याआधी तो संघाचा बॅटिंग कोच होता. आता त्याला प्रमोशन मिळालं आहे. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या हेड कोच पदावरून त्याने महेला जयवर्धनेची जागा घेतली आहे.

मुंबई इंडियन्सने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय की, "कायरन पोलार्डची हेड कोच म्हणून नियुक्ती करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. क्रिकेटमधली ही एक सर्वात जुनी आणि भक्कम अशी खेळाडू ते कोच पर्यंतची भागीदारी आहे." फ्रँचायझीच्या मते, पोलार्डला मुंबई इंडियन्सची संस्कृती आणि इथल्या अपेक्षांची खूप चांगली जाण आहे. टी-२० क्रिकेटमध्ये झालेले बदल त्याने जवळून पाहिले आहेत. त्यामुळे बदलत्या रणनीती आणि वाढत्या स्पर्धेत त्याचा अनुभव संघाच्या नक्कीच कामी येईल.

संघाचा वारसा पुढे नेणार

"पोलार्डला मुंबई इंडियन्सची संस्कृती आणि टॉप लेव्हलला खेळताना लागणाऱ्या गोष्टींची उत्तम समज आहे. टी-२० क्रिकेटचा विकास त्याने पाहिलाय. त्यामुळे खेळातील बदल, रणनीती आणि वाढत्या स्पर्धेबद्दल तो अचूक मार्गदर्शन करू शकतो. एक खेळाडू आणि अलीकडेच बॅटिंग कोच म्हणून त्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास पाहता, संघाला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी तो एकदम योग्य व्यक्ती आहे," असं मुंबई इंडियन्सने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं.

या नव्या जबाबदारीबद्दल बोलताना कायरन पोलार्डने आनंद व्यक्त केला. त्याने नीता अंबानी, आकाश अंबानी आणि संपूर्ण एमआय (MI) कुटुंबाचे आभार मानले. फ्रँचायझीसोबतच्या आपल्या घट्ट नात्याचा उल्लेख करत तो म्हणाला की, संघाचा वारसा पुढे नेण्यासाठी, नव्या टॅलेंटला संधी देण्यासाठी आणि चाहत्यांना सेलिब्रेशनची आणखी कारणं देण्यासाठी तो उत्सुक आहे.

पोलार्ड म्हणाला, "मुंबई इंडियन्सचा हेड कोच बनणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. एमआय हा माझ्या आयुष्याचा आणि करिअरचा खूप मोठा भाग राहिलाय. या संघासोबत, खेळाडूंसोबत आणि 'पलटन'सोबत माझं जे नातं आहे, ते माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. एक खेळाडू आणि नंतर कोच म्हणून मी हा प्रवास अनुभवला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स म्हणजे काय आणि ही ब्लू अँड गोल्ड जर्सी घालताना कोणती जबाबदारी येते, हे मला चांगलंच माहीत आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी नीता अंबानी, आकाश अंबानी आणि संपूर्ण एमआय कुटुंबाचा आभारी आहे. संघाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि आपल्या पलटनला सेलिब्रेशनच्या आणखी संधी देण्यासाठी मी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करायला उत्सुक आहे."

मालकांची प्रतिक्रिया

मुंबई इंडियन्सच्या सह-मालक नीता अंबानी यांनीही पोलार्डचं कौतुक केलं. वयाच्या २२ व्या वर्षी तो संघात आला आणि गेली १६ वर्षं तो या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे, असं त्या म्हणाल्या. हेड कोच म्हणून तो संघाला नक्कीच नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"पोलार्ड वयाच्या २२ व्या वर्षी मुंबई इंडियन्समध्ये आला आणि गेल्या १६ वर्षांत तो आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. एक खेळाडू म्हणून त्याने आम्हाला अनेक अविस्मरणीय क्षण दिले. तर एक कोच म्हणून त्याने आपला अनुभव आणि खेळाची समज नेहमीच शेअर केली आहे. आता हेड कोच म्हणून त्याला पाहताना आम्हाला खूप आनंद होतोय. एमआयची जर्सी घालणं आणि पलटनसाठी खेळणं म्हणजे काय, हे 'पॉली'ला चांगलंच माहीत आहे. मला खात्री आहे की तो याच जिद्दीने आणि विश्वासाने ही नवी जबाबदारी पार पाडेल. संघाला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते," असं नीता अंबानी म्हणाल्या.