मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या ठाकरे बंधूंच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामुळे दोघांमध्ये आगामी निवडणुकीसाठी राजकीय युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे : मागील आठवड्यात वरळी येथे झालेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मराठी मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या ठाकरे बंधूंच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामुळे दोघांमध्ये आगामी निवडणुकीसाठी राजकीय युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दिल्लीत गेले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकांवर होणाऱ्या परिणामांबाबत सखोल चर्चा झाल्याचे समजते. भाजपा दिल्ली नेतृत्व याबाबत अत्यंत गंभीर आहे. या संभाव्य युतीचा परिणाम विशेषतः मुंबई महापालिकेवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असे भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे सर्वेक्षण खासगी संस्थांमार्फत करण्यात आले असून त्याचे निष्कर्ष अमित शाह यांनी शिंदेंना सविस्तरपणे सांगितले आहेत.

मुंबई महापालिका भाजपच्या अजेंड्यावर

भाजप सध्या पूर्ण लक्ष मुंबई महापालिकेवर केंद्रित करत आहे. शिवसेनेचा पारंपरिक गड असलेल्या या महापालिकेत भाजपला सत्ता मिळवायची आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यास, मराठी मतांची मोठी एकजूट होऊ शकते आणि त्यामुळे महायुतीच्या गणितांवर परिणाम होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील गोटात चिंतेचे वातावरण आहे. ठाकरे बंधूंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यास त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटते. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अलीकडेच ठाकरे बंधूंना लक्ष्य करणारी विधाने केली होती. मात्र, अशा वक्तव्यांमुळे मराठी मतदार भावनात्मकदृष्ट्या ठाकरे बंधूंमागे उभे राहू शकतात, अशी भीती भाजपमध्ये आहे.

राज ठाकरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही

वरळीतील सभेमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंबरोबर थेट युतीची घोषणा केली नसली, तरी दोघांमध्ये जवळीक असल्याचे स्पष्ट दिसले. मात्र, राज ठाकरे नेहमीच स्वतंत्र भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते शेवटच्या क्षणी निर्णय बदलू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमित शाह यांनीही राज यांच्या भूमिकेचा आढावा घेतला आहे.

त्रिभाषा सूत्रावरून निर्माण झालेला वाद

राज्य सरकारमधील शिंदे गटाचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला मनसेने तीव्र विरोध केला आहे. खुद्द राज ठाकरे यांनीही या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. यामुळे शिंदे गटाने राज यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. दादा भुसे यांनी राज यांची भेट घेतली होती, पण त्यातून कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

या संदर्भातही शाह यांनी शिंदेंकडून सविस्तर माहिती घेतली. त्रिभाषा सूत्राला नेमका विरोध का आहे, यामागे कोणते सामाजिक किंवा राजकीय हितसंबंध आहेत, याची चर्चा करण्यात आली. राज ठाकरे यांचा विरोध हे केवळ भाषेपुरते मर्यादित नाही, तर त्यामागे जनभावना आणि मनसेच्या मतदारसंघात होणारा संभाव्य फटका याचाही विचार आहे.

शाह यांचा वाद टाळण्याचा सल्ला

महापालिका निवडणुका ज्या कधी जाहीर होतील, त्यापूर्वी कोणतेही वादंग निर्माण होऊ नये, यासाठी अमित शाह यांनी स्पष्ट आदेश दिल्याचे समजते. शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राज्यात अलीकडे काही वाद झाले आहेत. भाजपच्या काही मंत्र्यांनी याबाबत दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे महायुती एकसंध आहे आणि कोणतीही अंतर्गत विसंवाद नाही, असा संदेश लोकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली भेटीवर टीका

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली भेटीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी टीका केली आहे. त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले आणि माध्यमांशी बोलताना शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “आमचे गुरू ‘मातोश्री’वर आहेत, आणि शिंदे यांचे गुरू आता दिल्लीला गेले आहेत.”

विचारेंच्या या विधानातून शिंदेंवर टीका करताना त्यांनी शिंदेंच्या निष्ठेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते पुढे म्हणाले की, “गुरुपौर्णिमा म्हणजे निष्ठा दाखवण्याचा दिवस आहे. शिंदेंनी ज्या विचारधारेतून सुरुवात केली होती, त्या मूळ विचारांपासून ते दूर गेले आहेत.”

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. मराठी मतदारांच्या भावना, मुंबई महापालिकेतील सत्ता संघर्ष, भाजपच्या चिंतेची कारणे, शिंदे गटाची कसरत आणि मनसेच्या स्वतंत्र भूमिकांमुळे आगामी काळातील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची होणार आहेत. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची झालेली चर्चा ही त्याच राजकीय भूकंपाची पूर्वसूचना मानली जात आहे.

राजकारणात 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' हे समीकरण कधीही लागू होऊ शकते. ठाकरे बंधू एकत्र आल्यास, महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सध्या सुरू असलेली ही हालचाल म्हणजे केवळ युतीचा संकेत नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याची नांदी आहे.