Weather Update : राज्यभर किमान तापमानात मोठी घट झाली असून काही ठिकाणी पारा 7 अंशांखाली घसरला आहे. मुंबई, कोकणात थंड वारे आणि हलका पाऊस, तर विदर्भ-मराठवाड्यात शीतलहरींचा प्रभाव वाढताना दिसत आहे. 

Weather Update : नवीन वर्षात पाऊल ठेवताच मुंबईकरांना अनपेक्षित हवामान बदलाचा अनुभव येत आहे. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात हिवाळ्याचा कडाका वाढत असताना, दुसरीकडे मुंबईतील काही भागांमध्ये अचानक पावसाच्या सरी कोसळत आहेत. थंडी, पाऊस आणि तापमानातील चढ-उतार यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत थंडीबरोबर पावसाची सरप्राईज एन्ट्री

मुंबई, कोकण आणि किनारी भागांमध्ये रात्री व पहाटे थंड वारे वाहू लागले असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र, काही भागांत अचानक पावसाची रिपरिप सुरू झाल्याने मुंबईकर गोंधळून गेले आहेत. दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दिवसा उष्णता जाणवते, तर सकाळ-संध्याकाळ गारठा वाढतो. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवत आहे.

Scroll to load tweet…

पारा घसरला; पुढील चार दिवस राज्य गारठ्यात

गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्यातील परभणी येथे राज्यातील नीचांकी 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे 7 अंश, अहिल्यानगरमध्ये 7.5 आणि निफाडमध्ये 7.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. हवामान विभागानुसार, उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस किमान तापमान 7 ते 8 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

धुक्याचा फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना पुढील चार दिवस थंडी कायम राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक भागांत सकाळच्या वेळेत दाट धुकं पडत असल्याने दृश्यमानता कमी होत आहे. यामुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

विदर्भ-मराठवाड्यात शीतलहरींचा प्रभाव वाढला

डिसेंबर महिन्यात विदर्भात थंडीचे विक्रम नोंदवले जात आहेत. नागपूरसह संपूर्ण विदर्भात गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक थंड हिवाळ्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. यंदा डिसेंबरमध्ये तब्बल 17 दिवस तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहिल्याची नोंद झाली आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये किमान तापमान 8.6 अंशांपर्यंत घसरले असून, हवामान विभागाचा थंडी व शीतलहरींबाबतचा अंदाज खरा ठरत असल्याचं चित्र आहे.