- Home
- Mumbai
- बदलापूर-कर्जत प्रवास आता 'सुपरफास्ट' होणार! तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी; प्रवाशांची 'लोकल' डोकेदुखी मिटणार
बदलापूर-कर्जत प्रवास आता 'सुपरफास्ट' होणार! तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी; प्रवाशांची 'लोकल' डोकेदुखी मिटणार
Badlapur-Karjat New Local : रेल्वे मंत्रालयाने बदलापूर ते कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला अंतिम मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतील.

बदलापूर-कर्जत प्रवास आता 'सुपरफास्ट' होणार!
कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी, विशेषतः कल्याणपलीकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बदलापूर ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे बदलापूर, नेरळ आणि कर्जत पट्ट्यातील प्रवाशांचा प्रवास केवळ वेगवानच नाही, तर अधिक आरामदायी होणार आहे.
काय आहे हा प्रकल्प?
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानच्या ३२.४६ किलोमीटर अंतराचे चौपदीकरण केले जाणार आहे.
अंमलबजावणी: मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) या प्रकल्पाचे काम करणार आहे.
नियोजित कालावधी: भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर पुढील ३ ते ४ वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
फायदा कोणाला?: बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत या स्थानकांवरील लाखो प्रवाशांना याचा थेट लाभ मिळेल.
हा प्रकल्प का महत्त्वाचा आहे?
सध्या या मार्गावर केवळ दोनच मार्गिका आहेत. जेव्हा लांब पल्ल्याच्या गाड्या (Expres Trains) किंवा मालगाड्या या मार्गावरून धावतात, तेव्हा लोकल गाड्यांना आऊटरला रोखून धरावे लागते. यामुळे: १. लोकल गाड्यांना उशीर होतो. २. मर्यादित मार्गिकांमुळे नवीन लोकल फेऱ्या वाढवता येत नाहीत. ३. प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो.
नवीन मार्गिकांमुळे काय बदलणार?
तिसरी आणि चौथी मार्गिका झाल्यानंतर मेल-एक्सप्रेस आणि लोकलसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतील. परिणामी, लोकलच्या फेऱ्या वाढवणे शक्य होईल आणि वेळापत्रकही कोलमडणार नाही.
प्रकल्पाची सद्यस्थिती
या प्रकल्पाच्या आर्थिक मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष कामाला गती देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भूसंपादनाचे काम मार्गी लागताच युद्धपातळीवर रेल्वे रुळ टाकण्याच्या कामाला सुरुवात होईल.

