मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. अंधेरीतील पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळून तीन लहान मुले जखमी झाली, तर मलबार हिलमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला.
मुंबई: मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस सुरु झाल्यामुळं अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असल्याचं दिसून आलं आहे. मुंबईतील (Mumbai) अंधेरी पश्चिम येथील डी.एन. नगर पोलीस अधिकारी वसाहतीत इमारत क्रमांक 8 मधील रूम नं.145 (पहिला मजला) येथे रविवारी पहाटे 2 वाजता स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.
अपघात कसा झाला?
पोलीस वसाहतीमध्ये झालेल्या दुर्घटनेत तीन लहान मुले जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पोलीस वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी झालेल्या तीन लहान मुलांच्या डोक्यातून रक्तश्राव येत होता. आता या कोसळलेल्या घरातील पोलीस अधिकाऱ्यांनी खोली रिकामी करून भाड्याच्या घरात गेले. या परिसरात याआधी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.
पोलिसांनी बांधकाम विभागाकडे केली होती तक्रार
अशा प्रकारच्या दुर्घटना याआधी घडून गेल्या होत्या. त्यामुळं बांधकाम विभागाकडे पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. या ठिकाणच्या डागडुजीकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समजली. जर, पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची ही गत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
भिंत कोसळून झाला मृत्यू
मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाणे अंतर्गत हैदराबाद स्टेट येथील संरक्षण भिंत पावसामुळे आज कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सतीश निरके (वय.३५ वर्ष) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंगावर भिंत पडल्यामुळे सतीश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण येथे आल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
