मुंबईत फिरायला आलेल्या एका परदेशी तरुणीला दोन तरुणांनी त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. महालक्ष्मी परिसरात १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिचा पाठलाग करत, सेल्फीसाठी जबरदस्ती करण्यात आली. तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबईतल्या महालक्ष्मी परिसरात एका परदेशी महिला टुरिस्टसोबत छेडछाडीचा प्रकार घडला आहे. दोन तरुण तिचा १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाठलाग करत होते आणि तिने वारंवार नकार देऊनही सेल्फीसाठी जबरदस्ती करत होते. या तरुणीने स्वतःच हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला असून तो आता चांगलाच गाजतोय.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

इनेस फारिया (Ines Faria) असं या टुरिस्ट तरुणीचं नाव आहे. तिने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला. गेल्या दोन महिन्यांपासून ती भारतात आहे, पण असा अनुभव तिला पहिल्यांदाच आल्याचं तिने कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे.

मुंबईत नेमकं काय झालं?

“भारतात माझ्यासोबत असं पहिल्यांदाच घडलं... मी इथे दोन महिन्यांपासून आहे. आतापर्यंतचा माझा अनुभव खूप सुंदर, प्रेमळ आणि स्वागत करणारा होता. पण हा दिवस वेगळा होता. मी अनेकदा नाही म्हटल्यानंतरही ते आमचा पाठलाग करत होते आणि फोटो मागत होते. मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हतं आणि ते खूपच जबरदस्ती करत होते. त्यांनी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ आमचा पिच्छा पुरवला आणि त्यामुळे मला खूप दडपण आल्यासारखं वाटू लागलं. एका क्षणी तर मला जागा मिळवण्यासाठी त्यांना हाताने दूर ढकलावे लागले,” असं तिने लिहिलं आहे.

“एक गोष्ट लक्षात ठेवा, 'नाही' हे एक पूर्ण वाक्य आहे. आणि तुमची सुरक्षितता आणि कम्फर्ट नेहमीच सगळ्यात आधी येतो,” असंही तिने पुढे म्हटलं आहे.

View post on Instagram

या व्हिडिओमुळे आता ऑनलाइन विश्वात संमती (consent), सार्वजनिक ठिकाणी वागण्याचे नियम आणि मुंबई सारख्या गर्दीच्या शहरांमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे.