SpiceJet कंपनीच्या प्रवासी विमानाचे उड्डाणादरम्यान एक चाक गुजरातच्या धावपट्टीवर आढळून आले. हे विमान मुंबईला जात होते. त्यामुळे मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली.
मुंबई : गुजरातमधील कांडला येथून उड्डाण करताना स्पाइसजेट विमानाचे चाक निखळून खाली पडले. हे विमान मुंबईला उतरणार होते. ही घटना लक्षात आल्यानंतर गुरुवारी दुपारी मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली. कांडला-मुंबई मार्गावर जाणारे Q400 टर्बोप्रॉप विमान प्रवास सुरू ठेवत मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाण सुटल्यानंतर काही वेळातच कांडला येथील धावपट्टीवर विमानाचे एक बाह्य चाक आढळून आले. खबरदारी म्हणून, मुंबईत आपत्कालीन उपाययोजना सुरू करण्यात आल्या, ज्यामुळे उड्डाणांवर काही काळ परिणाम झाला. नंतर धावपट्टी सामान्य कामकाजासाठी मोकळी करण्यात आली.
स्पाइस जेटने घटनेची केली पुष्टी
"१२ सप्टेंबर रोजी, कांडला ते मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाचे बाहेरील चाक उड्डाणानंतर धावपट्टीवर आढळले. विमानाने मुंबईकडे प्रवास सुरू ठेवला आणि सुरक्षितपणे उतरले. सुरळीत लँडिंगनंतर, विमान स्वतःच्या शक्तीने टर्मिनलवर पोहोचले आणि सर्व प्रवासी सामान्यपणे उतरले," असे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले.
या घटनेमुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत नवीन चिंता निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर लंडनला जाणारे एक प्रवासी विमान कोसळले होते.


