एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख गेल्या काही दिवसांपासून संपर्काबाहेर असल्याने खळबळ उडाली आहे. जात प्रमाणपत्र वैधतेच्या वादामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची शक्यता वाढली असून मुंब्रा परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
Mumbai : ‘कैसा हराया’ या संवादामुळे चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे मुंब्रा परिसरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर विजयी झालेल्या सहर शेख यांच्या विजयावर सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात होते. अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी सहर शेख यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत प्रमाणपत्र बनावट असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
प्रशासनाच्या तपासात धक्कादायक माहिती
या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू केली असून ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात तक्रारीत तथ्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तपासादरम्यान सहर शेख या मूळ उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप अधिक गंभीर ठरत आहे.
पडताळणी समितीचा निर्णय निर्णायक ठरणार
सध्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. समितीचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता असून तो सहर शेख यांच्या विरोधात गेल्यास त्यांचे नगरसेवक पद धोक्यात येऊ शकते. तसेच पुढील कायदेशीर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
संपर्काबाहेर शेख कुटुंब; संशय अधिक गडद
दरम्यान, सहर शेख आणि युनूस शेख हे दोघेही प्रसारमाध्यमांपासून दूर राहून फोनही बंद ठेवत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे आणि ‘नॉट रिचेबल’ स्थितीमुळे मुंब्रामध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांना आक्रमकपणे उत्तर देणाऱ्या सहर शेख आता स्वतःच कायदेशीर अडचणीत सापडल्याने राजकीय वातावरण तापले आहे.


