Taj Hotel Bomb Threat Daud Ibrahim : मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा कॉल आला होता. या धमकीच्या कॉलनंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून हॉटेल परिसरात लक्ष ठेवलं जात आहे. 

मुंबई : मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आहे. रविवारी १२ जुलै रोजी, मध्यरात्री ताज हॉटेलमध्ये बॉम्बची धमकी आली. या धमकीनंतर कंट्रोलमधील पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. 'दाऊदने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे', अशा धमकीचा कॉल १२ वाजून १३ मिनिटांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये एका व्यक्तीकडून आला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ताज हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचा कॉल

धमकीचा कॉल आल्यानंतर ही माहिती मुंबईतील मेन कंट्रोल रुमला देण्यात आली. ताज हॉटेलमध्ये बॉम्बच्या धमकीनंतर कुलाबा पोलीस, क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन टीम आणि बॉम्ब शोधक आणि निकामी करणारं पथक ताज हॉटेलमध्ये पोहोचलं

पोलिसांकडून ताज हॉटेल परिसरात कसून तपास

क्राईम पोलीस, बॉम्ब शोधक पथक दाखल झाल्यानंतर या पथकाकडून ताज हॉटेलमधील मुख्य लॉबी, हॉटेलमधील विविध हॉल, हॉटेल्स, स्विमिंग पूल, पार्किंग, हॉटेलबाहेरील परिसर तसंच हॉटेलमधील इतर जागा तपासण्यात आल्या. या तपणासणीदरम्यान पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा इतर काहीही संशयास्पद आढळलं नाही.

धमकीचा कॉल नवी मुंबईतून आल्याची माहिती

बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर ताज हॉटेल आणि परिसरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. टेक्निकल टीमने केलेल्या तपासातून बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन नवी मुंबईतील तुर्भे या भागातून आला होता. ज्या क्रमांकावरुन फोन आला होता, त्या फोन नंबरच्या माध्यमातून पोलिसांकडून संबंधित कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. तसंच त्याच्याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. पोलिसांकडून हॉटेल परिसरातील अनेक हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. रविवारी रात्रीपासूनच्या तपासातून आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू, गोष्ट, हालचाली आढळून आल्या नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वीही आलेला धमकीचा कॉल 

दरम्यान, याआधी काही महिन्यांपूर्वी ताज हॉटेलमध्ये अशाच प्रकारच्या धमकीचा कॉल आता होता. त्यानंतर तात्काळ सुरक्षा वाढवण्यात आली होती. मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. त्यावेळीही कोणीही संशयित आढळलं नव्हतं.