रिलायन्स आणि केल्विनेटर हे दोन्ही विश्वासार्ह ब्रांड आहेत. केल्विनेटरला टेक ओव्हर केल्याने रिलायन्स हा ब्रांड अधिक मजबूत होताना दिसून येईल. याचा फायदा अधिक मार्केट कॅप्टर करण्यासाठी होईल.
मुंबई - रिलायन्स रिटेलने आज एक ऐतिहासिक निर्णय घेत, प्रसिद्ध ब्रँड केल्विनेटर विकत घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या बाजारात आपले नेतृत्व अधिक भक्कम करण्यासाठी रिलायन्ससाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा व्यवहार म्हणजे संपूर्ण देशभरातील ग्राहकांना अधिक मूल्य, गुणवत्ता आणि निवडीचा अधिकार देण्याच्या रिलायन्स रिटेलच्या वचनबद्धतेचा ठोस पुरावा आहे.
केल्विनेटर हा एक शतकाहून अधिक काळाचा जुना आणि विश्वासार्ह ब्रँड असून, घरगुती वापरासाठीच्या इलेक्ट्रिक रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानाचा जागतिक स्तरावरचा अग्रदूत मानला जातो. भारतात १९७०-८० च्या दशकात "द कूलस्ट वन" या प्रसिद्ध टॅगलाईनमुळे केल्विनेटरने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही तो त्याच्या आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट कामगिरी, टिकाऊ गुणवत्ता आणि वाजवी किमतीसाठी ओळखला जातो.
रिलायन्स रिटेलच्या 'सर्वांसाठी आधुनिक आणि समृद्ध जीवनशैली उपलब्ध करून देणे' या दृष्टिकोनाशी केल्विनेटरच्या अधिग्रहणाची दिशा अगदी सुसंगत आहे. केल्विनेटरचा नावीन्यपूर्ण वारसा आणि रिलायन्सची व्यापक विक्री साखळी यांच्या संयोगामुळे भारतातील प्रीमियम होम अप्लायन्सेस मार्केटमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे, उच्च गुणवत्तेचे उत्पादन देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढणार आहे.
ईशा अंबानी, कार्यकारी संचालक, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) यांनी सांगितले, “प्रत्येक भारतीयाच्या विविध गरजा भागवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान अधिक सुलभ, अर्थपूर्ण आणि भविष्योन्मुख करण्याच्या मिशनवर आहोत. केल्विनेटरच्या अधिग्रहणामुळे आमच्याकडे आता जागतिक पातळीवरच्या नावीन्यपूर्ण उत्पादनांचा विस्तृत पर्याय भारतीय ग्राहकांसाठी खुला करण्याची संधी आहे. आमची विशाल कार्यक्षमता, सेवा सुविधा आणि देशव्यापी वितरण नेटवर्क यामुळे ही संधी आणखी प्रभावशाली ठरणार आहे.”
केल्विनेटरच्या यशस्वी समावेशानंतर, रिलायन्स रिटेल क्षेत्रात नव्या संधी उभारण्यास, ग्राहकांशी जास्त मजबूत संबंध प्रस्थापित करण्यास आणि अधिक गतीने श्रेणी वाढवण्यास सज्ज झाली आहे. हे अधिग्रहण म्हणजे केवळ एक आर्थिक व्यवहार नसून, भारतीय ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजांना वेळेपूर्वी ओळखून त्यांची पूर्तता करण्याच्या रिलायन्सच्या दृढनिश्चयाची साक्ष आहे.
या अधिग्रहणाद्वारे रिलायन्स रिटेलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ती केवळ बाजारातली आघाडीची कंपनीच नाही, तर देशातील ग्राहकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होण्याच्या दिशेने ठामपणे पुढे जात आहे.


