जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर राजकरण तापले आहे. अशातच आव्हाड यांच्या मुलीला देखील खालच्या स्तरावर ट्रोल करण्यात आले. यावरुनच नताशा आव्हाडने सोशल मीडियावर संतप्त शब्दांत एक पोस्ट शेअर केली आहे. 

मुंबई : विधानभवन परिसरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जी भांडणाची घटना घडली, ती सध्या राज्यात मोठा गोंधळ माजवणारी ठरली आहे. या गोंधळाचा परिणाम इतका वाढला की जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड हिलाही सोशल मीडियावर खालच्या स्तरावर ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगवर संतप्त प्रतिक्रिया देताना तिने फडणवीस यांना आणि मुंबई पोलिसांना टॅग करत संताप व्यक्त केला आहे.

नताशा आव्हाडची सोशल मीडियावरील पोस्ट

नताशा आव्हाडने X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं की,"जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे. या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढलं जातंय. @Dev\_Fadnavis @MumbaiPolice तुम्ही फक्त मजा पाहत राहा!"

यासोबतच तिने एक स्क्रीनशॉट शेअर केला असून त्यात गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असल्याचे प्रोफाईल असणाऱ्या व्यक्तीकडून अत्यंत खालच्या भाषेतील शब्दांत तिला उद्देशून शेरेबाजी करण्यात आली आहे.

त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे –"ज्याच्या पोरीने मंगळसूत्र घालणारा न निवडता इतरधर्मीय निवडला तो आता मंगळसूत्राच्या नावाने गावभर बोंबलतोय! बेटी **** कॉकटेल फॅमिलीचा पाळीव कुत्रा ***"

Scroll to load tweet…

आव्हाड-पडळकर वाद

गेल्या आठवड्यात विधानभवनात आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना उद्देशून "मंगळसूत्र चोर" असा टोला लगावला होता. त्यानंतर बुधवारी पडळकर यांनीही आव्हाडांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर शिवीगाळ केली. याच रागातून दोघांचे समर्थक आमने-सामने आले आणि एकमेकांवर हात उचलले. विधानभवनासारख्या संवेदनशील ठिकाणी कार्यकर्ते अक्षरशः गावगुंडांसारखे वागल्याचं चित्र दिसून आलं.

नेमकं काय घडलं?

संध्याकाळी 5.30 च्या सुमारास विधानभवनाच्या तळमजल्यावर आव्हाड समर्थक नितीन देशमुख उभा होता. त्याच परिसरात पडळकर समर्थक ऋषिकेश टकलेही होता. देशमुख हा आव्हाड समर्थक असल्याचं लक्षात येताच टकलेने शिवीगाळ करत त्याच्या अंगावर धाव घेतली आणि कॉलर पकडून मारहाण केली. याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला.

दोघांनाही सुरक्षा रक्षकांनी वेळीच बाजूला केलं. पण, नंतर टकलेला तंबाखू मळायला देण्यात आलं, अशी तक्रार आव्हाड आणि जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव टकले हा **शिव मल्हार क्रांती सेनेचा जिल्हाध्यक्ष असून, त्याच्यावर 2016 ते 2021 या काळात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत देखील कारवाई झाली होती. त्यामुळे विधानभवनात अशा व्यक्तींची उपस्थिती आणि हातघाई होणं हे अधिकच चिंताजनक आहे.