सार

RBI Received Threats Over Email : मुंबईमध्ये 11 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा मेल भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ला प्राप्त झाला. मेल पाठवणाऱ्यांनी या मागण्या देखील केल्या आहेत. 

RBI Received Threats Over Email : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ला मंगळवारी (26 डिसेंबर 2023) मुंबईत बॉम्बहल्ला करण्यात येणार असल्याची धमकी देणारा मेल प्राप्त झाला आहे. या मेलमध्ये RBI गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI governor Shaktikanta Das) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे. 

मुंबईतील आरबीआय कार्यालय (RBI Office), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँकेसह (ICICI Bank) 11 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असून दुपारी दीड वाजता बॉम्बस्फोट होईल, अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली.

पोलिसांनी या सर्व ठिकाणी जाऊन तपास केला. पण काहीही हाती लागले नाही. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

"मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब"

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेलमध्ये असे नमूद करण्यात आले होते की, “आम्ही मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब ठेवले आहेत. RBI ने खासगी क्षेत्रातील बँकांच्या सहकार्याने देशात सर्वात मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात RBI गव्हर्नर शक्तीकांत दास, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, काही उच्चपदस्थ अधिकारी तसंच देशातील काही प्रसिद्ध मंत्र्यांचाही समावेश आहे. याबाबत आमच्याकडे पुरेसे पुरावेही आहेत.”

ईमेलमध्ये राजीनाम्याची मागणी

मेलमध्ये पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, “RBI गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि घोटाळ्याचा खुलासा करून एक पत्रक जारी करावे, अशी आम्ही मागणी करतो. 

तसेच या दोघांसह घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या सर्वांना सरकारने शिक्षा द्यावी, अशीही आमची मागणी आहे. दुपारी दीड वाजण्यापूर्वी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर एक-एक करून सर्व 11 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात येईल".

या प्रकरणामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. हा मेल नेमका कोणाकडून आला आहे, यामागे कोणाचा हात आहे, यासह अन्य सर्व बाबींचा शोध पोलीस घेत आहेत.

आणखी वाचा :

NewsClick Case: आरोपी प्रमुख HR अमित चक्रवर्ती सरकारी साक्षीदार होण्यास तयार, कोर्टाकडे मागितली परवानगी

US Crime : कोण आहे प्रियंका तिवारी? जिने अमेरिकेत स्वतःच्याच 10 वर्षीय मुलाची केली हत्या, कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

Dawood Ibrahim : मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेबाबत मोठा निर्णय, या दिवशी होणार लिलाव