Maharashtra Rain : महाराष्ट्रातील या ६ जिल्ह्यांना रेड अलर्ट, समुद्रात उंच लाटांची शक्यता
मुंबई : पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या सहाजिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठीही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

समुद्रात 4.8 मीटरपर्यंत उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये २५ जुलै सायंकाळी ५.३९ पासून ते २७ जुलै रात्री ८.३० पर्यंत 4.1 ते 4.8 मीटरपर्यंत उंच लाटांचा इशारा आहे.
यामुळे लहान बोटींना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्रधूप आणि किनाऱ्यांवर लाटांचे तडाखे बसण्याची शक्यता लक्षात घेता, संबंधित जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
रत्नागिरीत ‘जगबुडी’ नदीने ओलांडली इशारा पातळी
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून, आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग
पवना धरण सध्या ८२.२१% भरले असून पाणलोट क्षेत्रात पावसामुळे 1600 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जाण्याची शक्यता आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतूनही विसर्ग सुरू
मोडक सागर - 4488.25 क्युसेक्स
मध्य वैतरणा - 2012.67 क्युसेक्स
तानसा - 3315.25 क्युसेक्स
आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सतर्क
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांना संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत.
नागरिकांना सूचना
गरजेव्यतिरिक्त प्रवास टाळावा
नद्यांच्या काठावर न जाण्याचे आवाहन
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे
समुद्रकिनाऱ्यांवर किंवा घाट परिसरात गर्दी करू नये

